जळगाव लाईव्ह न्यूज । शेतजमिनी खरेदीची नोंद सातबाऱ्यावर लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव तालुक्यातील करंज सजा येथील तलाठ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. अजय बिडवे असे कारवाई करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव असून या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

प्रकरण काय?
तक्रारदाराने त्यांच्या पत्नीच्या नावे करंज सजाच्या कार्यक्षेत्रात शेती खरेदी केली होती. या खरेदी केलेल्या क्षेत्रावर खरेदीची नोंद घेण्यासाठी तलाठी बिडवे यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने २३ रोजी एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी २६ मार्च रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. या वेळी बिडवे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

मात्र, तक्रारदार लाचेची रक्कम देण्यास गेले असता, बिडवे यांना संशय आल्याने त्यांनी ती स्वीकारली नाही. लाचेची मागणी सिद्ध झाल्याने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ नुसार जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे व त्यांच्या पथकाने केली आहे.








