जळगाव जिल्हाजळगाव शहर

गुड न्यूज ! आता अवघ्या ३ तासांत गाठता येणार दिल्ली; जळगावहून इंदूरमार्गे दिल्लीसाठी विमानसेवा

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. जळगाव विमानतळावरून आता देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीसाठी व्यावसायिक विमानसेवा सुरू होत आहे. ‘अलायन्स एअर’ कंपनीच्या माध्यमातून इंदूरमार्गे नवी दिल्लीसाठी व्यावसायिक विमानसेवा येत्या १ मे ते ३१ मे या कालावधीत ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाणार असून, याचे अधिकृत वेळापत्रक विमानतळ व्यवस्थापनाला प्राप्त झाले आहे. ही सेवा इंदूरमार्गे असल्याने जळगाव-इंदूर कनेक्टिव्हिटीलाही यामुळे बळकटी मिळणार आहे.

jalgaon delhi flight

जळगाव विमानतळावरून फ्लाय ९१ विमान कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून गोवा, पुणे, हैदराबाद अशी विमानसेवा सुरू आहे. तसेच अलायन्स एअर विमान कंपनीच्या माध्यमातून मुंबई आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू आहे. जळगाव विमानतळावरून थेट दिल्लीपर्यंत नवीन विमानसेवा करण्याच्या दृष्टीनेही काही दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. अखेर त्याचा मुहूर्त निघाला आहे. ‘अलायन्स एअर’ कंपनीच्या माध्यमातून १ मे ते ३१ मे दरम्यान ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे.

खरंतर रेल्वे किंवा रस्तेमार्गे दिल्ली गाठण्यासाठी जळगावकरांना १८ ते २४ तासांचा दीर्घ प्रवास करावा लागतो. मात्र, या नवीन विमानसेवेमुळे जळगाव ते दिल्ली हे अंतर आता अवघ्या ३ तास १० मिनिटांत कापले जाणार आहे. अशाच प्रकारे जळगावहून थेट इंदूरसाठी रेल्वे सुविधा नसल्याने रस्ते मार्गे इंदूर जाण्यासाठी ७ ते ८ तास लागतात. मात्र, आता विमानाने केवळ ४० मिनिटांत इंदूर पोहचता येणार आहे.

आठवड्यातून तीन दिवस उड्डाण

ही नवीन विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध असेल. दिल्लीहून दुपारी ०४.५० वाजता विमान उड्डाण घेईल आणि ०६.५० वाजता इंदूर येथे पोहचेल. तेथून रात्री ०७.१५ वाजता ते उड्डाण घेईल आणि रात्री १९.५५ जळगाव येथे पोहचेल. अशाच प्रकारे, आठवड्याचे तिन्ही दिवस जळगावहून रात्री ०८.२० वाजता विमान उड्डाण घेईल आणि ०९.०० वाजता इंदूर येथे पोहचेल. तेथून रात्री ०९.२५ वाजता ते उड्डाण घेईल आणि ११.३० वाजता दिल्लीत पोहचेल. यामुळे जळगाव-दिल्लीसोबतच जळगाव-इंदूर कनेक्टिव्हिटीलाही मोठी चालना मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button