११ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह कबरीतून काढणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको मध्ये एका ११ वर्षीय बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब समोर आली असून मृतदेह कबरीतून काढणार आहे. मुलीच्या वडिलांनी कुणालाही माहिती न देता तिच्या पार्थिवाचे दफन केल्याने संशय व्यक्त केल जात आहे.

याबाबत असे की, पिंप्राळा हुडको परिसरात ११ वर्षाची मुलगी ही आपल्या आई-वडिलांसोबत राहते. दरम्यान, या मुलीचा २३ एप्रिल रोजी आकस्मीक मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी कुणालाही काहीही न सांगता तिच्या पार्थिवाचे दफन केले. दरम्यान, आपल्या नातीचे अचानक मृत्यू झाल्याची माहिती तिचे आजोबा (आईचे वडील) व मामा यांना मिळाली.

त्यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार केली असून पोलिसांनी तिच्या आई व वडिलांची चौकशी केली असता त्यांना विसंगती आढळून आली. यामुळे आता त्या मुलीचा मृतदेह उकरून काढून तिच्या शरीरावर घातपाताच्या काही खुणा आहेत का? याची तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्या २ तासापासून पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे रामानंद नगर पोलिसात तळ ठोकून आहेत.