जिल्ह्यातील एसटीच्या ९१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, विभागात पाच कोटींचे नुकसान
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । राज्य परिवहन महामंडळाचे ( एसटी ) राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही. अखेर एसटी महामंडळाच्या विभागीय पातळीवरून गुरुवारी कारवाईचा बडगा उगारत जळगाव विभागातील ८ आगारांतील ९१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, या कर्मचाऱ्यांबरोबर जळगाव आगारातील ६०० आंदोलक कर्मचाऱ्यांनाही निलंबित करावे, अशी मागणी गुरुवारी आंदोलकांतर्फे मनोज सोनवणे यांनी केली आहे.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटीची जिल्ह्यातील ११ आगारांतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तर प्रशासनाने कर्मचाऱ्यांना आंदोलनासाठी प्रोत्साहित करणे व कामावर रुजू होऊ न देणे या कारणांसाठी गुरुवारी जळगाव विभागातील ९१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
९१ कर्मचारी निलंबित : जळगाव विभागात गुरुवारी एकूण ९१ कर्मचारी निलंबित करण्यात आले. यात रावेर १२, मुक्ताईनगर १०, पाचोरा १२, चाळीसगाव १५, जामनेर १०, भुसावळ १४, चोपडा ८, अमळनेर १० असे विभागातील ९१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
एसटी महामंडळ प्रशासन शिवशाही सुरू करणार
एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करण्यासाठी रविवारपासून आंदोलन सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय थांबवण्यासाठी चालक-वाहक उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारपर्यंत शिवशाही सुरू करण्यात येईल. तसेच विभागात आतापर्यंत ९१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
६०० संपकरी म्हणतात, आम्हालाही निलंबित करा ?
जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरू राहील. या आंदोलनात सर्व कर्मचारी स्वेच्छेने सहभागी होत आहेत. प्रशासनाने आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या कर्मचाऱ्यांबरोबर जळगाव आगारातील ६०० आंदोलक कर्मचाऱ्यांनाही निलंबित करावे, अशी मागणी गुरुवारी आंदोलकांतर्फे मनोज सोनवणे यांनी केली आहे.