⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

अमळनेरात गटशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल ; नेमकं प्रकरण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२४ । अमळनेर पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शाळेची मान्यता रद्द करण्याची धमकी देत शाळेला मिळालेली शासकीय अनुदानातील ५ टक्के रक्कमेची खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. रावसाहेब मांगो पाटील (रा. अमळनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या गटशिक्षणाधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत असे की, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील जवखेड येथील शाळेबद्दल व्हॉटसअॅपवर बदनामीकारक मजकूर टाकला होता. त्यामुळे शाळेचे लिपीक उमेश राजेंद्र पाटील यांनी अमळनेर पंचायत समिती यांच्याकडे दि. २७ मे रोजी अर्ज केलेला होता. त्याची नकल घेण्यासाठी उमेश पाटील व शाळेचे सहकारी अमळनेर पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी दि. २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता गेले होते.

त्यावेळी उमेश पाटील व सहकारी यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांची भेट घेवून शाळेची बदनामी करू नका असे सांगितले. त्यावर रावसाहेब पाटील यांनी शिवीगाळ करून सन-२०१२ पासून तुमच्या शाळेला जे शासकीय अनुदान मिळाले आहे. त्याचेवर मला ५ टक्के दराने पैसे द्या नाहीतर तुमच्या शाळेची मान्यता रद्द करून टाकेन अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर उमेश पाटील व त्यांचे सहकारी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दि. २८ मे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.