जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२४ । मद्यधुंद अवस्थेत बस चालविणे एका चालकाला महागात पडले आहे. जळगाव एसटी डेपो मधील बाभूळगाव मुक्कामाला जाणाऱ्या बसचे चालक मद्यधुंद असल्याने नागरिकांनी वेळीच बस थांबून चालकाची विभाग नियंत्रकाकडे तक्रार केली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुसऱ्या चालकाची व्यवस्था करून बस मार्गी लावली. याबाबत संबंधित बस चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
याबाबत असे की, जळगाव डेपोची बस क्रमांक (एम. एच. १४ बी टी २३०४) ही बस बाभूळगाव या गावाला रात्री मुक्कामी जाते. नेहमीप्रमाणे दि. १६ रोजी रात्री बस आपल्या मुक्काम स्थानी निघाली असता पाळधीचा पुल पार केल्यानंतर बसलेल्या प्रवाशांच्या लक्षात आले की, बस चालक हा मदयधुंद अवस्थेत आहे. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी एका हॉटेलजवळ बस थांबवली व कंडक्टरला याबाबत सांगितले. याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना मिळताच त्यांनी रात्री खाजगी वाहनाने त्या ठिकाणी जाऊन प्रवाशांशी चर्चा केली.
संबंधित मदयधुंद वाहनचालक आनंद माळी याच्या जागी दुसऱ्या वाहन चालकाची व्यवस्था करून बस मार्गस्थ केली. याबाबत विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, चालक आनंद माळी याचे मेडिकल केल्यानंतर त्याने मद्यसेवन केल्याचे आढळून आले. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे व यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.