दुध संघ अपहार प्रकरणातील संशयितांची आणखी पोलीस कोठडी वाढली!
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । दुध संघ अपहार प्रकरणातील संशयितांची आणखी दोन दिवस पोलीस कोठडी वाढली आहे. म्हणजे, दि.२१ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरिशंकर अग्रवाल, रवी मदनलाल अग्रवाल आणि चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम.पाटील हे अटकेत आहेत. त्यांना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता सर्वांना सदर पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संशयित आरोपी मनोज लिमये यांच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत बी ग्रेड तुप हे अखाद्य असते, अशी कबुली त्यांनी दिल्याची माहिती आज पोलिसांनी न्यायालयात दिली असल्याचे कळते. तसेच लिमये यांनी याबाबत ज्या निविदा मागवल्या त्यात प्रत्यक्षात मात्र, अखाद्य तूप विक्री असा कुठेही उल्लेख केलेला नाहीय. याबाबत चौकशीत समाधानकारक उत्तरे देखील दिलेले नाहीत. लिमये हे कृत्य कुणाच्या तरी दबावाखाली करत होते?, याबाबतही सकारात्मक उत्तरे दिलेले नाहीय. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण आहे ? याचा शोध घेणे बाकी असल्याचेही न्यायालयात सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
एमडी मनोज लिमये आणि सी.एम. पाटील यांनी संगणमत करून किशोर पाटील याला फायदा पोहचविणेसाठी विठ्ठल रुख्मीणी एजन्सी दिली होती. तसेच सदर एजन्सीला खाद्य पदार्थ विकण्याचे परवाना असतांना देखील त्यांनी अखाद्य पदार्थ विक्री केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे यामागील सुत्रधार कोण आहे? याचा शोध आता पोलीस घेणार आहेत.
संशयित आरोपी अनिल अग्रवाल यांनी पोलीस चौकशीत 36 डब्बे काढून दिलेले आहे. परंतू संशयित आरोपी हरी पाटील यांनी सादर केलेल्या बिलांच्या प्रतीनुसार त्यांनी दि. 1 ऑगस्ट ते दि. 17 ऑगस्टपर्यंत 36 वेळा एकूण 1725 किलो तुप खरेदी केलेले आहे. परंतू मुद्देमाल जेथून जप्त करण्यात आला त्या साक्षीदारांने दिलेल्या जबाबात शिवपार्वती मंदीरासाठी 8 डब्बे महिन्याला व दुर्गा मंदीराला 3 डब्बे महिन्याला लागतात, असे सांगितले आहे. त्यामुळे गुन्हा घडल्यापासून 33 डब्बे त्यांनी वापरलेले आहेत. त्यामुळे उर्वरित 92 डब्बे मिळून आलेले नाही. त्याअनुषंगाने गुन्हयातील 1300 किलो तूपाचे काय केले? कुठे विल्हेवाट लावली?, याचा देखील पोलीस शोध घेणार आहेत.
संशयित आरोपी मनोज लिमये व सी. पाटील यांना पूर्व कल्पना होती. त्यामुळे हरी पाटील यांना देत असलेले माल ते कोणाला विकत आहे?, हे तपासण्याची जबाबदारी असतांना देखील त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांचे पालन केले नाही. दुसरीकडे अनिल अग्रवाल हे जळगाव शहर व इतर ठिकाणावरील चॉकलेट व्यवासयिकांना चॉकलेट बनविण्याचे खाद्य पदार्थ पुरवित असल्याचे चौकशीत आज समोर आले असून ते कोठे-कोठे माल सप्लाई करतात. याबाबत त्यांना माहिती आहे. आता पोलीस त्या-त्या ठिकाणी त्यांना सोबत नेत चौकशी करणार असल्याचे कळते.