मारहाण करून व्यापाऱ्याची रोकड लांबविणाऱ्या संशयिताला अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२४ । जळगावात जबरी चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी धरणगाव तालुक्यात कापूस व्यापाऱ्याची गाडी अडवून हल्लेखोरांनी दीड करोड रुपयाची रोकड लांबविली होती. त्यानंतर जामनेर तालुक्यातही एका व्यापाऱ्याला अज्ञात तीन जणांनी दुचाकीवर येवून मारहाण करून बॅगेतील १ लाख ९३ हजारांची रोकड लांबविल्याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फरार संशयित आरोपीच्या एमआयडीसी पोलीसांनी कुसुंबा येथून मुसक्या आवळल्या. ऋषीकेश रमेश मावळे (रा. कुसुंबा ता. जळगाव) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून जबरी चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश रतन पवार रा. जामनेर हे विवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास बॅगेतून १ लाख ९३ हजार ५०० रूपयांची रोकड घेवून ते दुचाकीने घराकडे निघाले होते. त्यावेळी त्यावेळी जामनेर ते शहापूर रोडवरील बेलफाट्या रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या तिन जणांनी त्यांचा रस्ता आडवून बेदम मारहाण केली व सोबत असलेली रोकडची पिशवी घेवून पसार झाले होते.
याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, व्यापाऱ्याची लुट ही कुसुंबा येथील ऋषीकेश रमेश मावळे रा. कुसुंबा ता. जळगाव याने केली असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्याने त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार गुरूवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी ऋषीकेश रमेश मावळे रा. कुसुंबा ता. जळगाव याला पथकाने अटक केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील हस्तगत केली आहे. इतर दोन जण अद्याप फरार आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.