जळगाव लाईव्ह न्यूज | १८ ऑक्टोबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात मध्यप्रदेश सीमेकडून चोपडा मार्गे गावठी पिस्तूल येत असल्याची माहिती पोलिसांना देखील आहे. याच बाबतीत गोपनीय माहिती मिळाल्याने चोपडा पोलिसांनी एका तरुणाला ३ गावठी पिस्तूल व काडतुसांसह अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ५० हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
उमर्टीकडून चोपडाकडे येणाऱ्या बसमध्ये निळ्या रंगाचे टीशर्ट घातलेला अंदाजे २० ते २२ वर्षे वय असलेला संशयित युवक हा गावठी पिस्तूल घेऊन चोपड्याकडे येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चुंचाळेकडे जाणाऱ्या रोडवर चुंचाळे गावाजवळ उमर्टीकडून चोपडाकडे येणारी बस थांबवून बसमधील संशयित युवकाची ओळख पटवून त्याचेजवळ असलेल्या बॅगची तपासणी केली .
त्यामध्ये १ लाख ३० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे ३ पिस्तूल, दोन हजार रुपये किमतीचे १ खाली मॅगझिन व १० हजार रुपये किमतीचे १० जिवंत काडतूस तसेच रोख ३ हजार ३०० रुपये व ५ हजार रुपये किमतीचा १ मोबाईल फोन असा एकूण १ लाख ५० हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला.
संशयिताचे नाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव हनुमान गेनाराम चौधरी (वय २१, रा. लोहावत, जि. जोधपूर, राजस्थान) असे सांगितलेले असून त्याने सदरचे पिस्तूल व राउंड हे उमर्टी मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीकडून सत्रासेन येथे ताब्यात घेतल्याचे सांगितले. या संशयिताविरुद्ध चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे तपास करीत आहेत.