सुरेशदादा जैन यांना न्यूमोनियाची लागण, मुंबईला होणार उपचार

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२२ । माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना घरकूल प्रकरणात नियमीत जामीन मंजूर झाल्यानंतर गेल्या आठवड्यातच ते जळगावात आले होते. दरम्यान, सुरेशदादा जैन यांना न्यूमोनियाची लागण झाली असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्यात येत आहे.

घरकूल प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना न्यायालयाकडून नियमीत जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मिळाल्यानंतर जैन गेल्या आठवड्यातच जळगावात आले होते. जळगावात आगमन होताच समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले होते. गेल्या आठवडाभरापासून विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या भेटीसाठी जात आहेत.

सुरेशदादा जैन यांना न्यूमोनियाची लागण झाली असून त्यांना रात्री जळगावात डॉ.महाजन यांच्याकडे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सुरेशदादा जैन यांची प्रकृती स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना एअर अम्ब्युलन्सद्वारे मुंबईला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार आहे. जळगाव विमानतळावर एअर अम्ब्युलन्स बोलाविण्यात आली असून समर्थक त्याठिकाणी जमले असल्याची माहिती मिळाली आहे.