जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२५ । महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आज (दि. २८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना कोणतीही स्थगिती नसल्याचे स्पष्ट केले असून निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ च्या आधी होतील.

५० टक्के आरक्षणाची मर्यादा ज्या ज्या ठिकाणी ओलांडली आहे, त्या ठिकाणी त्वरित निवडणुका घ्या, असे कोर्टाकडून सांगितले. या प्रकरणावर पुढील सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

४० नगरपरिषदा आणि १७ नगरपंचायतीमध्य ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची माहिती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, असे स्पष्ट केले. ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादी ओलांडली आहे. त्याचा निर्णय जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.










