जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२४ । राज्यसह जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याच दरम्यान कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे घडली आहे. बद्रीसिंग पुना चव्हाण (वय ५८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
बद्रीसिंग चव्हाण हे शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र उत्पन्न चांगले न आल्याने कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते होते. याच तणावात ते राहत असल्याचे चव्हाण यांच्या नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान १६ जुलैला सकाळी त्यांची पत्नी, दोन्ही मुले आणि सुना शेतात गेले होते. यावेळी त्यांचे नातू आणि बद्रीसिंग चव्हाण घरीच होते. घरात कोणी नसताना सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला.
बाहेर खेळायला गेलेला बद्रीनाथ यांचा नातू पाणी पिण्यासाठी घरात आला, तेव्हा ही घटना उघडकीला आली. नातूने कुटुंबातील इतरांना माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांनी घरी धाव घेत बद्रीनाथ चव्हाण याना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.