शुक्रवार, सप्टेंबर 15, 2023

दुर्दैवी! आठ महिन्यांत जळगाव जिल्ह्यात ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपविले जीवन, वाचा ही आकडेवारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२३ । सावकारी कर्ज, नापिकी, दुष्काळ, अस्मानी आणि सुलतानी संकटाला कंटाळून गेल्या आठ महिन्यात नाशिक विभागात येणाऱ्या पाच जिल्ह्यांत २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा मोठा आहे.

जानेवारी २०२३ ते ऑगस्टपर्यंत उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या जिल्ह्यात २०० शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याची कारणे जरी वेगवेगळी असली, तरी कर्ज आणि नापिकी ही मुख्य दोन कारणे समोर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात ४८, जळगाव जिल्ह्यात १०४, नाशिक जिल्ह्यात आठ, धुळे जिल्ह्यात ३६, तर नंदुरबार जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी सरकार दप्तरी आहे.

जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा मोठा असून, त्या खालोखाल अहमदनगर व धुळ्याचा नंबर लागतो. २०० पैकी आजपर्यंत ६५ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, १०३ शेतकऱ्यांची चौकशी अजून सुरू आहे.

३२ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. ६५ शेतकरी पात्र असून, अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अजूनही चौकशी सुरू आहे. त्यांना लाभ मिळण्यासाठी महसूल विभाग सध्या गतिमान कामे करताना दिसत आहे.