जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२५ । छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक असलेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. योगेश शिवराम सोनवणे असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते जळगावचे रहिवाशी होते. दरम्यान गळफास घेण्यापूर्वी त्यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या करण्याचे कारण यात सांगितले आहे. त्यात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असून त्यानुसार याप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यासह एका कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावचे रहिवाशी असलेले योगेश सोनवणे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते. दरम्यान योगेश सोनवणे हे नेहमीप्रमाणे कार्यालयात गेले होते. कार्यालयात अन्य कोणी कर्मचारी नसताना त्यांनी गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या करण्याचे कारण यात सांगितले आहे.
व्हिडिओत घेतली वरिष्ठांची नावे
योगेश सोनवणे यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये कार्यालयात होणारा त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे त्यांनी स्पष्ट केली आहेत. तर योगेश सोनवणे यांना तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहायक मानसिक त्रास देत होते. तसेच अपमानास्पद वागणूक देऊन सुटीच्या दिवशी अतिरिक्त काम लावले जात होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दोन जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. तर मृत योगेश सोनवणे यांच्या पत्नी विमल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे आणि कृषी सहायक किशोर बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.