जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । पाडळसरे येथून जवळच असलेल्या शिरसाळे येथील युवकाचे लग्न जमत नसल्याने नैराश्यातून, त्याने राहत्या घरी छताच्या कडीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश बुधा पाटील (वय ३२) असे मृताचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. १० रोजी दुपारी ही घटना उघड झाली.

याबाबत असे की, शिरसाळे येथील रमेश बुधा पाटील याचे लग्न जमत नसल्याने त्याने आत्महत्या केली. मृताची आई सुसाबाई पाटील या शेतातून घरी आल्यावर ही घटना समोर आली. खासगी वाहनाने युवकाला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी हवालदार भरत गायकवाड यांनी पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात डॉ.जी.एम.पाटील यांनी शवविच्छेदन केले. सायंकाळी दफनविधी झाला.









