जळगाव लाईव्ह न्यूज । भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत जवान एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आला असून मात्र यादरम्यान या जवान भयंकर टोकाचं पाऊल उचललं आहे. आईला मिसळ आणण्यास पाठवून दीपक अशोक निकम (वय ३८) या जवानाने गळफास घेतला. ही घटना जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे घडली. काही वेळाने आई घरी परतली असताना दरवाजा उघडताच मुलाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील दीपक निकम हे २०१५ पासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. दहा दिवसांपुर्वीच दीपक हे एक महिन्याच्या रजेवर गावी आले होते. दरम्यान १८ फेब्रुवारीला सकाळी उठल्यानंतर दीपक काही वेळ गावात फिरायला गेले. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांनी आई धोंडाबाई यांना मिसळ आणायला सांगितली.
मुलाने सांगितल्याप्रमाणे आई मिसळ घेण्यासाठी गेली. यावेळी घरी कोणीही नसताना मधल्या घरात जाऊन दीपक यांनी गळफास घेत आत्महत्या केली. साधारण अर्ध्या तासाने आई मिसळ घेऊन घरी परतल्या. त्यांनी दरवाजा लोटून उघडला असता समोर दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. मुलाचा मृतदेह पाहून धोंडाबाई यांनी जोरात आरोड्या मारत आक्रोश केला. आवाजामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली.
यानंतर दिपकला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दीपकला मृत घोषित केले. दरम्यान दिपकने टोकाचा निर्णय कोणत्या कारणाने घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिपकच्या मृत्यूच्या घटनेने नातेवाईक, कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दीपकच्या मृत्युने आई- वडीलांनी वृद्धापकाळाचा आधार गमावला आहे. तर दोघा मुलांचे पित्रृछत्र हरपले आहे. सदर घटनेप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.