जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२४ । एकीकडे आज स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असताना जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथे एका कॉम्प्युटरच्या दुकानात व्यापाऱ्याने तळमजल्यावर जाऊन छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. रमेश देवराम पाटील (वय ५१, रा.निवृत्ती नगर, जळगाव) असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
दरम्यान ही आत्महत्या घरासाठी फायनान्शिअल कर्ज काढलेले असल्यामुळे ते फेडण्याच्या विवंचनेतूनच केले असल्याचे पोलिसांमध्ये दाखल खबरीतून स्पष्ट झाले आहे. रमेश देवराम पाटील यांनी सकाळी गोलाणी मार्केट परिसरात दुकानात आल्यावर देवपूजा केली. त्यानंतर त्यांनी स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात त्यांचा भाचा मनोज कुमार सुरेश जाधव (वय ३४, रा. निवृत्ती नगर, जळगाव) याने खबर दिली आहे.
रमेश पाटील नेहमी घरासाठी काढलेले फायनान्शिअल कर्ज कसे फेडता येईल त्या विवंचनेत राहत होते. याच विवंचनेतून कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे खबरमध्ये म्हटले आहे.याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास फौजदार संजय झाल्टे करीत आहेत.