⁠ 
सोमवार, मे 6, 2024

देवकर रूग्णालयात आतड्यांच्या कॅन्सरवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात मोठ्या आतड्यातील कॅन्सरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे तिसऱ्या स्टेजवरील कॅन्सरवर ही शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णाला एका अर्थाने नवजीवन मिळाले आहे. शस्त्रक्रियेनंतर दहा दिवस यशस्वी उपचार करून रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला.

साकळी (ता. यावल) येथील कांतीलाल चौधरी यांना गेल्या काही महिन्यांपासून पोटदुखी व शौचातून रक्त जाण्याचा त्रास होता. त्यांनी देवकर रुग्णालयाचे कन्सल्टंट कॅन्सर सर्जन डॉ.अतुल भारंबे त्यांच्याशी संपर्क साधून तपासणी केली. सिटी स्कॅन आणि बायोप्सी नंतर त्यांना मोठ्या आतड्यात कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यांच्यावर आधी केमोथेरपी देखील करण्यात आली होती. परंतु शेवटी शस्त्रक्रिया करून कॅन्सर पोटातून काढून फेकण्याशिवाय पर्याय नव्हता. तसे डॉ. भारंबे यांनी रुग्णाला स्पष्ट केले व त्यानंतर देवकर रूग्णालय प्रशासनाने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

त्यानुसार चौधरी यांच्या शुक्रवारी (ता. 7) रुग्णालयात सर्व चाचण्या करण्यात आल्या आणि आज शनिवारी यांच्या मोठ्या आतड्यावरील कॅन्सरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना येथील सर्व सुविधायुक्त अशा आयसीयू वार्डात हलविण्यात आले. कॅन्सर सर्जन डॉ. अतुल भारंबे, भूलतज्ञ ऋतुराज कक्कड यांच्यासह रुग्णालयातील संबंधित टीमने यात योगदान दिले.

सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया होणार

डॉ. भारंबे यांनी सांगितले की, देवकर रूग्णालयात सर्व चाचण्या एकाच छताखाली आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असे शस्त्रक्रिया कक्ष असल्याने आम्ही येथे तोंडाचा, घशाचा, आतड्यांचा, लिव्हरचा अशा कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून रुग्णाला दिलासा देऊ शकतो. चौधरी यांच्यावरील शस्त्रक्रिया ही महात्मा फुले जीवनदायी योजना अंतर्गत करण्यात आली असल्याने रुग्णालाही आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाला आहे. यापुढेही देवकर रूग्णालयात सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया करण्यात येतील, रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असेही डॉ. भारंबे यांनी सांगितले.

व्हिडीओ मुलाखत पहा :

हे देखील वाचा :