जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२५ । धरणगाव तालुक्यातील एका आश्रम शाळेतील पंधराहून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाल्याची माहिती सामोर आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

याबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत हद्दीतील खाज्याजी नाईक आश्रम शाळेतील हा प्रकार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना अचानक त्रास जाणवल्याने त्यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी गोवरची लक्षणे आढळून आले. यानंतर तातडीने सर्व संशयित रुग्ण विद्यार्थ्यांना आयसोलेट करून उपचार सुरू करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.

या प्रकारानंतर आरोग्य विभागानेही युद्धपातळीवर तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला असून या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

काय आहेत गोवरची लक्षणं?
गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो.
अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅशेस येणं या आजाराची प्रमुख लक्षणं मानली जातात.
सुरुवातीला मुलांना खोकला आणि सर्दी ही लक्षणं दिसतात. तसंच डोळे लाल होऊ शकतात.
बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो.
गोवर झाल्यावर काय काळजी घ्याल?
आरोग्य तपासणी दरम्यान संशयित रुग्णांना विटामीन ए दिलं जात आहे. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले जात आहेत.
गोवर आजाराचे निदान करण्यासाठी रक्त आणि लघवीची तपासणी केली जाते. तसंच स्वॅबद्वारे सुद्धा चाचणी केली जाते.
या चाचण्या महत्त्वाच्या असून गोवर किंवा रुबेलाचे निदान करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोवरची कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने चक अप करून घ्यावे.
घरच्याघरी उपचार किंवा अंगावर काढू नये. कारण गोवर हा संसर्गजन्य आजार आहे










