जळगाव जिल्हा

जळगावचा चारा आता जिल्ह्याबाहेर नेता येणार नाही; प्रशासनाचा कडक आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये Trigger-१ (प्रथम कळ) दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उत्पादित चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता असल्याने भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ मधील अधिकारांचा वापर करून जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात अथवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई केली आहे.

या आदेशात हिरवा चारा, कडबा, कोणत्याही प्रकारची कुट्टी, कोणत्याही प्रकारची पेंढ, टीएमआर व इतर पशुखाद्य यांचा समावेश आहे. तथापि, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला हा आदेश लागू राहणार नाही.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. हा आदेश दिनांक १ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील ते आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button