जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे सूत्र सुरूच आहे. चोरट्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अनेक प्रयत्न केले. मात्र, त्याचा काही फरक पडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्ब्ल दोन ठिकाणी जबरी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये हजारोंचा ऐवज चोरून नेला असून या घटनेने पुन्हा एकदा शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वेगवेगळ्या पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील हिरवडखेडा येथील रहिवासी विशाल संजय लिंगायत (वय २२) हे दि. २५ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास स्वतःच्या मालकीची (एमएच १९ ए क्यू ६४६४) क्रमांकाच्या दुचाकीने वाघाडी ते हिंगोणे दरम्यान वळणावर चक्रधर मंदिर जवळ रस्त्याने जात असताना मागून अज्ञात तीन इसम आले आणि गाडीची चावी काढून घेतली व शेतात ओढून नेले. त्यांच्या हातातील बॅग हिसकावून आतील २७ हजार रोख व एक मोबाईल बळजबरीने काढून लंपास केले. या प्रकरणी लिंगायत यांनी दि. २६ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. घटनास्थळी संजय ठेंगे यांनी भेट दिली. त्यानुसार अज्ञात तीन भामट्यांविरुद्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास रमेश चव्हाण करत आहे.
भुसावळ तालुक्यातील दीनदयाल नगर, अशोक नगर लेंडापुरी येथील रहिवासी आकाश प्रकाश थोरात (वय ३०) हे दि.२६ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या कामाचे पैसे घेऊन घरी येत असताना कालिका माता मंदिराच्या पुढे अशोक नगर भुसावळ येथे आरोपी तस्लीम उर्फ काळ्या शेख रा. दीनदयाल भुसावळ याने फिर्यादीस अडवून बळजबरीने २ हजार रुपये हिसकावून घेतले. व लाथा बुक्यांनी मारहाण, शिवीगाळ केली. या प्रकरणी थोरात यांनी बाजारपेठ पोलिसांत तक्र्रार दिली. त्यानुसार आरोपी तस्लीम उर्फ काळ्या शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सुदर्शन वाघमारे करत आहे.