⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

अमृत २.० डीपीआर बनविण्यासाठी अजूनही एजन्सीची नियुक्ती नाही !

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । शहरात अमृत योजनेचा पाहिला टप्पा अंतिम टप्प्यात असून दुसऱ्या टप्प्यासाठी मनपाने लवकरात लवकर डीपीआर तयार करणे आवश्यक होते. त्यासाठी शासनाने दि.२६ डिसेंबर २०२२ ही अंतिम मुदत दिली होती. परंतु गेल्या सात ते आठ महिन्यापासून मनपा प्रशासनाने अद्यापही अमृत २.०चा डीपीआर बनविण्यासाठी एजन्सी नियुक्त केलेली नाही, तसेच या अमृत २.० अंतर्गंत होणाऱ्या मलनिस्सारण (भूमिगत गटारी) योजनेसाठी लागणारा मल शुध्दीकरण प्रकल्पासाठी अद्यापपर्यंत जागा देखील मनपा प्रशासनाने निश्चित केलेल्या नाहीत.

केंद्र शासन व राज्य शासनाकडून जळगाव शहरासाठी अमृत योजना मंजुर करण्यात आलेली आहे. या योजनेत शहरातील संपुर्ण भागात जलवाहिन्या व मल वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात शहरातील जलवाहिनी टाकण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच पहिल्या टप्प्यात २०० किमीची मल वाहिनी (मलनिस्सारण) देखील झालेली आहे.

मात्र, शहरातील वाढीव भागातील जलवाहिनी व ६०० किमीची मल वाहिनी टाकण्याचे काम अद्याप बाकी असल्यामुळे शासनाने अमृत २.० (दुसरा टप्पा) साठी लवकरात लवकर डीपीआर तयार करून शासनाला पाठवावा अश्या सुचना मनपाला केल्या होत्या. परंतु डीपीआर तयार करण्यासाठी एजन्सी नेमणुकीवरून अनेक वाद विवाद झाल्यामुळे हा विषय रेंगाळला होता. त्यानंतर शासनाने महापालिकेला दि. २६ डिसेंंबर २०२२ ही डीपीआर सादर करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती व या अल्टीमेटम नंतर देखील मनपाने डीपीआर सादर न केल्यास जळगाव शहर अमृत योजनेतून वगळण्याचा इशारा देखील नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी दिला होता.

मात्र, त्यानंतर देखील मनपा प्रशासनाने डीपीआर तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्त केलेली नाही. तसेच अमृत २.० अर्तंगत होणाऱ्या दोन मल शुध्दीकरण केंद्रासाठी लागणाऱ्या जागा देखील मनपा प्रशासनाने अद्यापपर्यंत निश्चित केलेल्या नाहीत, त्यामुळे महापालिका प्रशासनाला अमृत २.०चे गांभिर्य आहे का? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

जळगाव शहरात गेल्या वीस वर्षांपुर्वी पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिन्या टाकण्यात आला असून आतापर्यंत याच जलवाहिन्यांवर शहरातील पाणी पुरवठा सुरु आहे. परंतु या जलवाहिन्या अतिषय जीर्ण झाल्यामुळे वारंवार पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडतात त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असतो. तसेच या जलवाहिन्यांवर अनेक ठिकाणी लिकेज असल्यामुळे शहराला दररोज ७० एमएलडी पाण्याची आवश्यकता असतांना ९० एमएलडी पाण्याची उचल वाघुर धरणातून करावी लागत आहे. परिणामी दररोज २० एमएलडी पाण्याची नासाडी होत असल्याचे समोर आले आहे.

** १२०० कोटींचा होणार डीपीआर

अमृत २.० अंतर्गंत शहरातील वाढीव भागातील पाणी पुरवठा लाईन व जलकुंभ तयार करण्यात येणार आहेत. तसेच ६०० किमीची मल वाहिनी टाकण्यात येणार असून दोन ठिकाणी मल शुध्दीकरण केंद्र तयार करण्यात येणार आहेत. तसेच वाघुर पंपिंग स्टेशनमधील मशिनरी व जलवाहिनी दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच या कामामुळे जे रस्ते गटारींचे नुकसान होणार आहे, त्याची दुरुस्ती देखील अमृत २.० मधून करण्यात येणार असून एकुण १२०० कोटींच्या जवळपास हा डीपीआर होणार आहे.