स्थानिक संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच जळगावातील शरद पवार गटाच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

नोव्हेंबर 10, 2025 5:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२५ । राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून यांनतर जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून या निवडणुकांबाबत जळगाव शहरासह जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात युती होणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र यातच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची शिंदे गटासह अजित पवार गटासोबत जाण्याची तयारी असल्याचे वक्तव्य एका नेत्याने केलं आहे. भाजप वगळून कुणासोबतही आघाडी करण्याचे स्पष्ट निर्देश आम्हाला असल्याचे खळबळजनक वक्तव्य शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

sharad pawar jpg webp

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा जळगाव जिल्हा संपर्क दौरा रविवारी पार पडला. त्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा आणि शहराचा आढावा त्यांनी घेतला. या दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटाची महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी नैसर्गिक आघाडी होईल.

मात्र, महाविकास आघाडी नैसर्गिक आघाडीसोबतच अन्य कोणतेही पक्ष सोबत आल्यास त्यांच्या समवेत आघाडी करण्यात येईल. पक्ष श्रेष्ठींकडून भाजप सोडून अन्य कोणत्याही राजकीय पक्षांशी युती करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. समविचारी पक्षांना विश्वासात घेऊन शिंदे गटासह अजित पवार गटाशी देखील युती करण्याची आमची तयारी असेल, असे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजप हा आमचा क्रमांक एकचा शत्रू असून, त्यांना वगळून कुणासोबतही आघाडी करावी, असे स्पष्ट निर्देश आम्हाला असल्याचे वक्तव्य शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केले. यासाठी आम्ही शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसशी चर्चा करून शिंदे गटासह अजित पवार गटाशी किंवा अन्य कोणत्याही राजकीय पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. यावेळी शरद पवार गटाचे निरीक्षक भास्करराव काळे देखील उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now