⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ‘या’ तारखेला भुसावळात

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२३ । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भुसावळात येणार आहे. येत्या गुरुवारी 30 रोजी ते भुसावळसह मलकापूर विभागाच्या दौर्‍यावर येत आहे. याबाबतची माहिती भुसावळचे आमदार संजय सावकारे व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी पत्रकार परीषदेत दिली. बावनकुळे हे प्रसंगी तीन विधानसभा मतदारसंघाची शहरात बैठक घेतील तसेच भाजपा सुपर वॉरीयर्सला ते मार्गदर्शन करणार असून त्यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकारी रॅलीदेखील काढणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आमदार सावकारे यांच्या सुरभी नगरातील संपर्क कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौर्‍या संदर्भात सुक्ष्म नियोजन बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे म्हणाले की, लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 2024 च्या नियोजनासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे दौर्‍यावर येत आहेत. याप्रसंगी भुसावळ, चोवडा व रावेर विधानसभा मतदारसंघाबाबत बैठक होईल तसेच जामनेर, मुक्ताईनगर-बोदवड व नांदुरा मतदासंघाबाबत मलकापूरात बैठक होणार आहे. सुपर वॉरीयर्सची जवाबदारी व दायीत्व याबाबतही प्रदेशाध्यक्ष मार्गदर्शन करतील.

आमदार संजय सावकारे म्हणाले की, शहरातील सिंधी कॉलनीतील बडा सेवा मंडलमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजता भाजपा सुपर्स वॉरीयर्सची बैठक होईल. तत्पूर्वी 11 ते 4 दरम्यान मलकापूरात बैठक होईल. भुसावळ शहरात भुसावळसह चोपडा येथील 300 वॉरीयर्सची बैठक होणार असून त्यांना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी सिंधी कॉलनीत 250 मीटरचा बावनकुळे है दौरा करतील तसेच नागरीकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतील तसेच काही बदलांबाबतही अभिप्राय जाणतील व त्याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर करतील.