⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

टंचाईग्रस्त भागात प्रलंबित कामे मिशन मोडवर सुरू करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ ऑगस्ट २०२३। यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिल्यामुळे जलसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्याबाबतीत मोठ्या प्रमाणात ओढाताण सुरु आहे. दहा जिल्ह्यांतील ३५० गावे आणि १३१९ वाड्यांवर ३६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

भविष्यातील पावसाची स्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाने टंचाईग्रस्त गावात व संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावात पाणीपुरवठा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे मिशन मोडवर सुरू करा, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.टंचाई कालावधीत करावयाच्या उपाययोजनांबाबतची आढावा बैठक नुकतीच मंत्रालयात झाली. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधिक्षक अभियंता अजय सिंह, जलजीवन मिशनचे दहा जिल्ह्यांतील अधिकारी या वेळी उपस्थित होते. तसेच, दहा जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, राज्यात दहा जिल्ह्यांत टँकर सुरू आहेत. या जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी तेथील लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेऊन पुढील टंचाईसंदर्भात उपाययोजनांबाबत नियोजन करावे. आगामी काळात पर्जन्यमान कमी असल्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन स्थानिक नागरिकांना करावे.पाणी वाटपाचे योग्य ते नियोजन करावे, जेणेकरून टंचाई कालावधीत पाण्याची उपलब्धता होईल असे पाहावे. भविष्यात लागणाऱ्या टँकरसाठी पाणी उपलब्ध होईल असे नियोजन करावे. टंचाई सदृश गावात जलजीवन मिशन व अन्य पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेऊन त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्काळ नियोजन करण्याचे निर्देशही श्री. पाटील यांनी या वेळी दिले.

राज्यात नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा या दहा जिल्ह्यांत सध्या ३५० गावे व १३१९ वाड्यांमध्ये ३६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.