जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने नवीन वर्षाचं गिफ्ट दिलं असून शेती आणि पीक कर्जाशी संबंधित २ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सरकारने घेतलेला हा नवीन निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आला आहे. या निर्णयाबाबतचा अधिकृत आदेश महसूल व वन विभागाकडून जारी केला आहे.

यापूर्वी सरकारने प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ केले होते. राज्यातील विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फायदा झाला. आता शेतकऱ्यांना कर्जप्रक्रियेत आर्थिक सवलत देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्ज घेण्यासाठी बँकांकडून कर्ज घेताना कागदपत्रांसाठीचा तांत्रिक खर्च लागणार नसून शेतकऱ्यांच्या खिशालावरील अतिरिक्त भार कमी होणार आहे.

कर्ज करारनामा, गहाणखत, तारण, हमीपत्र, तसेच गहाणाचे सूचनापत्र यांसारख्या कागदपत्रांवर लागणारे मुद्रांक शुल्क अनेकांसाठी अतिरिक्त खर्चाचे कारण ठरत होते.







