⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास सुरु राहणार एसटीचे तिकीट आरक्षण

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीत बसप्रवास सुखाचा आणि आरामदायी व्हावा याकरिता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक विभागाने २४ तास तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसेसदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महामंडळाच्या ताफ्यात सहाशेवर बसेस उपलब्ध आहेत. गर्दीचा अंदाज घेऊन जादा बसेसची व्यवस्था प्रत्येक विभागात करण्यात आल्याची माहिती महामंडळातील आगार प्रमुखांनी दिली आहे.

यंदा निर्बंधमुक्त वातावरणात धूमधडाक्यात दिवाळी साजरी करण्याची तयारी सर्वांनीच केली आहे. करोना संसर्गाच्या सावटामुळे सलग दोन वर्षे अनेकांना दिवाळी सणासाठी गावी जाणेही शक्य होऊ शकले. नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी गावी नातलग आणि स्नेहीजणांसोबत साजरी करण्याचे नियोजन नागरिकांनी केले आहे. स्वतःची वाहने नसलेल्यांसाठी गावी जाण्याकरिता राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी हेच हक्काचे साधन असते. त्यामुळे जळगाव, धुळे, नाशिकच्या मुख्य बसस्थानकासह जिल्हाभरातील बसस्थानकांमध्ये त्या त्या भागातील प्रवाशांची गर्दी उसळते. बसेसच्या तुलनेत प्रवाशांची गर्दी अधिक असल्यास अनेकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. दिवाळी हंगामात गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी तिकीट आरक्षित करून प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. याकरिता मुख्य बसस्थानकात २४ तास तिकीट आरक्षण कक्ष सुरू ठेवण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

दीपावली कालावधीत नाशिक विभागाने शहर आणि जिल्ह्यातील एकूण १३ आगारांमार्फत बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नाशिक, मालेगाव, मनमाड, सिन्नर, नांदगाव, लासलगाव, येवला, कळवण, सप्तशृंग गड यासारख्या मार्गांवर बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय जिल्ह्याबाहेर नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बोरिवली, मुंबई, पुणे, अहमदनगर, तुळजापूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नागपूर, सुरत, वापी, सिल्वास, अशा अनेक मार्गांवर बससेवा उपलब्ध करून दिली आहे. हा प्रवास सुलभ व्हावा याकरिता प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन सीबीएस येथे २४ तास आरक्षण खिडकी सुरू राहणार आहे.