जळगावातील रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; २० प्रकारच्या रानभाज्यांची विक्री
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२३ । आपल्या संस्कृती, परंपरेतून आलेल्या भाज्या म्हणून आपण रानभाज्यांना ओळखतो. मानवी आरोग्याला आवश्यक असणारी खनिजे, महत्त्वाची अन्नद्रव्ये व अनेक औषधी गुणधर्म फक्त रानभाज्यांमध्ये आढळून येतात. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी आज येथे केले.
प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर, आत्माचे प्रकल्प संचालक पांडुरंग साळवे, रोटरीचे सरिता खाचणे, मुनीरा तरवारी, योगेश भोळे आदी उपस्थित होते.
श्री.प्रसाद म्हणाले, निसर्गाकडून भरभरून मिळणाऱ्या रानभाज्यांचे जतन व संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. इतर फास्ट फूडपेक्षा प्रत्येक शासकीय कार्यक्रम, बैठकांमध्ये रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थ असणे आवश्यक आहे.
केळीवरील कुंकंबर मोझॅक, करपा आदी रोगांवर करायचा उपाययोजना व व्यवस्थापन याबाबत जाणीव जागृती करणाऱ्या पोस्टरचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रानभाजी अंबाडी पासून बनवलेले पराठे, फांगची भजी, मशरूमचा वडा आदी अस्सल गावरान पदार्थांचा आस्वाद घेतला. महिला बचतगटांच्या सदस्यांशी त्यांनी संवाद ही साधला.
ह्या रानभाज्या ठरल्या आकर्षण –
मायादेवी नगर येथील रोटरी क्लब येथे आयोजित या रानभाजी महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटनापूर्वीच रानभाज्या खरेदीसाठी लोकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती.
नागरिकांनी रानभाज्या खरेदीसाठी गर्दी केली होती. उद्घाटनापर्यंत विक्रेत्यांच्या २५ टक्के मालाची विक्रीही झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत महोत्सवात संपूर्ण भाजीपाला संपलेला होता. महोत्सवात करटोली, फांग, बांबूचे कंद, केळीचे फूल या रानभाज्या आकर्षण ठरल्या. रानमेथी , गुडवेल, म्हशोला, काया कळूची साल, अर्जुन सारळ्या, कळसागाची पाला, जंगली कांदा, ओवा, दूधी शेंग, मिस्वाक लकडी, शतावरी, चाकवत, काटेमाठ, कुरडू, तरोटा यासह इतर विविध २० पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश महोत्सवात होता. चोपडा येथील चक्रधर महिला बचतगट, एंजल महिला बचतगट, धरणगाव येथील ओम शांती स्वयंसहाय्यता बचतगटांच्या महिलांनी रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थ ही महोत्सवात विक्रीसाठी ठेवले होते. या महोत्सवाच्या यशस्वितेसाठी श्रीकांत झांबरे, देविदास कोल्हे तसेच सर्व तालुक्यातील सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले.