⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

स्पा सेंटरच्या नावाखाली आंबटशौकिनांना आयुर्वेदिक नव्हे मसालेदार मसाज

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शरीराला आयुर्वेदीक आणि औषधी तेलांचा मसाज देत आराम देण्याचा प्रकार म्हणजे स्पा थेरपी. अलीकडच्या काळात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, अश्लील चाळे करण्याचे अड्डे अशी सुरु असल्याचे प्रकार समोर आले होते. स्पा सेंटरची कीड जळगावला देखील लागली का असा संशय आता व्यक्त होऊ लागला आहे. रिंगरोडवर सुरु असलेल्या एका स्पा सेंटर मालकाने त्याठिकाणी काम करणाऱ्या विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. जळगावातील काही स्पा सेंटर छुप्या पद्धतीने आणि विना परवानगी सुरु असून काही आंबटशौकीन केवळ मन समाधानासाठी त्याठिकाणचा अनुभव घेत असतात.

स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट उघड झाल्याच्या घटना मेट्रो सिटीत भरपूर झाल्या असल्या तरी जळगावात मात्र स्पा सेंटर सुरु असल्याचे मोजक्याच लोकांना विशेषतः आंबटशौकिनांनाच माहिती आहे. जळगाव शहरात देखील अनेक ठिकाणी अनधिकृत स्पा सेंटर असून बहुतांश शहराच्या मध्यवर्ती भागातच आहे. स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती असली तरी अद्याप कारवाई कुठेही झालेली नाही. स्पा सेंटर म्हणजे केवळ मसाज करण्याचे ठिकाण असल्याचा आजवर अनेकांचा समज आहे. खरे पहिले तर स्पा सेंटर हे शरीराला आराम देण्यासाठी आयुर्वेदिक तेलाच्या साहाय्याने मालिश करण्याची एक उपचार पद्धती आहे. परंतु त्याला आता वेगळे वळण दिले जात आहे.

स्पा सेंटरच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटच्या ठिकाणी सरार्सपणे वेश्या व्यवसाय सुरु असतो. जळगावात मात्र असे काही नसले तरी काही अनधिकृत छुप्या स्पामध्ये अश्लील चाळे मात्र सुरु आहे. एखाद्या स्पा सेंटरमध्ये प्रवेश केल्यावर ठरलेल्या पॅकेज आणि थेरपीनुसार तुम्हाला एका खोलीत नेले जाते. ग्राहकाला ‘युज अँड थ्रो’ प्रकारची अंतर्वस्त्रे आणि एक रुमाल दिला जातो. मसाजला सुरुवात होताच मसाज करणाऱ्यांकडून तुम्हाला काही ऑफर्स दिल्या जातात. कोडवर्डमध्ये विचारणा केल्या जाणाऱ्या या सेवेसाठी १ हजारापासून ३ हजारापर्यंत दर आहेत. अगोदर ठरलेल्या पॅकेज व्यतिरिक्त हि रक्कम अतिरिक्त असते.

ग्राहकाचे समाधान होण्यापूर्वीच पैसे घेतले जात असल्याने पुढे काही घडले तरी तक्रार करायला त्याला संधी नसते. स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिला, मुली बहुतांशी बाहेर जिल्हा आणि राज्यातील असतात. मुळात अशा स्पा सेंटरमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला थेट प्रवेश न देता जुन्या किंवा नेहमीच्या ग्राहकाच्या ओळखीचा दाखला द्यावा लागतो त्यानंतरच सेवा मिळत असते. स्पा सेंटरवर कारवाई करण्याचे काम पोलीस प्रशासनाचे असते परंतु आपल्याकडे आजवर कारवाई झाल्याचे पाहावयास मिळत नाही. अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी प्रशासन जागे होईल आणि कारवाईला लागेल अशी अपेक्षा आहे.