जळगाव जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत कोविड-19 विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्यावतीने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यात अद्याप ज्या नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नसेल त्यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आज दुपारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोगय यंत्रणेचे वैद्यकीय अधिकारी यांचेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, जिल्ह्यात कोविड-19 लसीचे अडीच लाख डोस आलेले आहेत. आगामी काळात आणखी 4 लाख डोस उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड-19 लसीकरण मोहीमेस वेग देऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी 8 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोगय यंत्रणेने लोकप्रतिनिधींसह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, धार्मिक स्थळे, मंदिरे आदि ठिकाणी लसीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. जिल्ह्यात आतापर्यंत 18 लाख 47 हजार नागरीकांनी पहिला डोस तर 6 लाख 6 हजार नागरीकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. अद्याप ज्या नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नसेल त्यांनी तातडीने पहिला डोस घ्यावा. तसेच ज्या नागरीकांना पहिला डोस घेऊन पुरेसा कालावधी झाला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यावा. यामुळे कोविड विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यात कोरोना लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत असताना जिल्ह्यातील एकही पात्र नागरीक लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभागाची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्यात.
प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रत्येक गावासाठी स्वतंत्र आणि सूक्ष्म नियोजन करावे. केंद्रातील प्रत्येक गावाच्या लोकसंख्येनुसार तसेच शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक दिवशी लसीकरण सत्राचे आयोजन करावे. याशिवाय प्रत्येक गावाच्या लसीकरणासाठी पथके निश्चित करावीत. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना पहिला डोस प्राधान्याने द्यावा. लसीकरणासाठी आरोग्य सेविका, अधिपरिचारिका, वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टरांची मदत घ्यावी. लसीकरणासाठी लाभार्थ्यांना शिबिराच्या ठिकाणी बोलावणे, त्यांची बैठक व्यवस्था आदींची व्यवस्था अन्य विभागाच्या सहकार्याने करावी. याच प्रमाणे नागरी भागात ही नियोजन करावे. उपलब्ध लससाठ्यानुसार पुढील तीन- तीन दिवसांचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार पुढील लस पुरवठा होईल. त्यानुसार नियोजन करावे.
आगामी सण, उत्सवाचे दिवस लक्षात घेता जिल्ह्यातील व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी, कामगार यांचे लसीकरण तातडीने करुन घ्यावे. लसीकरण झालेले नसताना कामगार कामावर ठेवला असेल तर अशा व्यावसायिकांवर कडक कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याशिवाय शासकीय व निमशासकीय सेवेतील ज्या अधिकारी व कर्मचारी यांचे अद्याप लसीकरण झाले नसेल त्यांचे वेतन रोखण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे सुतोवाचही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले.
जिल्ह्यातील विविध सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळानीही लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाला मदत करावी. तसेच त्या-त्या गावातील सरपंच, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस, आशा वर्कर्स, पदाधिकारी यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याबरोबरच लसीकरणाबाबत आप-आपल्या गावातील ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याचे सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.