विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संचालकपदी डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांची नियुक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज | 21 जून 2023 |  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संचालकपदी डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जयेंद्र दिनकर लेकुरवाळे यांची आज नियुक्ती करण्यात आली. कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी त्यांना विद्यापीठात नियुक्तीचे पत्र दिले.

डॉ. लेकुरवाळे हे 15 वर्षांपासून संरक्षण व सामरिक शास्त्र विषयात अध्यापनाचे कार्य करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध विषयांवर 22 पुस्तके, दोन नाटके, 1 चित्रपट संहिता लिहिली आहे. गाव खेड्यातील गरजू मुलांनी स्पर्धा परीक्षेत करियर करावे यासाठी प्रा. लेकुरवाळे हे कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत राज्यभरात 500 हुन अधिक मुलेमुली एमपीएएसी व यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

प्रा. डॉ. लेकुरवाळे यांनी मोंढाळे ता. भुसावळ गावात “स्पर्धा ग्राम” हे राज्यातील पहिलं खेडे “पायलट प्रोजेक्ट” म्हणून निर्माण केले आहे. या हरहुन्नरी, बहुआयामी व्यक्तीच्या निवडीने कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य, उपेक्षित, शेतकरी कुटुंबातील तसेच हजारो आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.