---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण विशेष

गणरायाच्या मुर्तीला अटक!, सरन्यायाधीशांच्या घरच्या गणपती आरतीवरुन राजकारण, कुठे नेवून ठेवलायं महाराष्ट्र माझा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : १८ सप्टेंबर २०२४ : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… जयघोषात राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात आला. राज्यात गणेशोत्सव शांततेत पार पडला. मात्र दोन घटनांमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यातील पहिली घटना म्हणजे, कर्नाटकात गणेशोत्सवानंतर गणपतीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी गणेशमूर्तीच ताब्यात घेतली आणि दुसरी घटना म्हणजे, भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीच्या आरतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावल्यानंतर त्यावर विरोधी पक्षाने केलेले राजकारण! महाराष्ट्राच्या राजकारणाला गौरवशाली परंपरा राहिली आहे. मात्र सध्या उठसुठ कोणत्याही विषयांवर खालच्या पातळीवर राजकारण होतांना पाहिल्यानंतर कुठे नेवून ठेवलायं महाराष्ट्र माझा ? असे म्हणावे लागत आहे.

WhatsApp Image 2024 09 18 at 12933 PM

कर्नाटकात गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडायचे सोडून विघ्नहर्त्या गणरायाची मूर्तीच ताब्यात घेतली. आरोपींना अटक केल्यानंतर जसे पोलिसांच्या गाडीत डांबून नेले जाते अगदी तसेच गणरायाच्या मूर्तीला नेतांना पाहून समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. धार्मिक कार्यक्रमात देवाची मूर्ती जप्त केल्याचे चित्र भारतात प्रथमच पाहायला मिळाल्याने संतापाची लाट उसळणे स्वाभाविकच आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, मात्र महाराष्ट्र काँग्रेसने यावर एक शब्दही काढला नाही, असा संताप व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. कर्नाटकमध्ये गणपती बाप्पाला अटक करण्या काम काँग्रेस सरकारने केलंय. गणेशोत्सवात गणपती बाप्पांसोबत हे असं करता तुम्ही, कुठे फेडणार हे पाप, अशा शब्दात कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेवरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ५० पेक्षा जास्त जणांना अटक केल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकात ही कारवाई कोणत्या परिस्थितीत झाली यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. किंबहुना, पूजा किंवा विसर्जन होणार असताना मूर्ती घेऊन जाणे खरोखरच चिंताजनक आहे. आजपर्यंत एकाही देवाची मूर्ती अशा पद्धतीने जप्त केलेली नाही, कर्नाटक सरकारने करुन दाखविले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही.

---Advertisement---

स्वत:चे ठेवायचे झाकून अन् दुसऱ्याचे पहायचे वाकून

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे गणरायाचे भक्त आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपतीच्या आरतीला हजेरी लावली, त्यावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीनेही टीका केली होती. दरम्यान, यासंदर्भात काँग्रेस, उद्धव ठाकरे गटासह अनेक नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य करत सरन्यायाधीशांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले. मात्र त्यानंतर भाजपाने एका इफ्तार पार्टीमध्ये तत्कालिन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व तत्कालिन सरन्यायाधीश केजी बालकृष्णन यांचे फोटो व्हायरल केल्यानंतर काँग्रेसचा बुरखा फाटला.

इफ्तार पार्टी चालते पण गणपतीची आरती नको!

2009 मध्ये देशात काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि केजी बालकृष्णन सरन्यायाधीश होते. मनमोहन सिंग यांनी सरकारी निवासस्थानात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यात सरन्यायाधीशही उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या गणपती आरतीवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसजनांना आज मनमोहन सिंग आणि बालकृष्णन यांच्या त्या अन्य पक्षाचा विसर पडला. शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी टीका केली असून याचा अर्थ काँग्रेसच्या शासकीय निवासस्थानी होणाऱ्या इफ्तार पार्टीला परवानगी आहे पण गणेशजींची आरती नाही, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

शरद पवारांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांचा अपमान

संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन नुकतेच पार पडले. त्यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शरद पवार, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती अशी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. त्यांच्यासमोर स्वत:ला पुरागामी म्हणणाऱ्या ज्ञानेश महाराव यांनी श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली. ज्ञानेश महाराव यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या क्लिप सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरातील अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने यांनी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ज्ञानेश महाराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र यावर ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एकाही नेत्याने ब्र काढला नाही. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळेप्रत्येकवेळी हिंदूधर्मालाच का लक्ष केले जाते ? या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे शोधण्याची आवश्यकता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---