⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

अशोकभाऊंच्या सामाजिक सेवेची चतुःसूत्री…

जळगाव लाईव्ह न्यूज । दिलीप तिवारी । जळगावातील बहुतांश मित्रमंडळींचे मित्र व हितचिंतक अशोकभाऊ जैन यांचा आज ५९ वा वाढदिवस. अशोकभाऊ ज्येष्ठ नागरीक होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. शाळकरी वयात असताना गल्लीत तीन-चार स्वतंत्र मंडळे स्थापन करून वेगवेगळा उत्सव साजरा करणाऱ्या सर्व मित्रांना एकत्र करून ‘एक मोहल्ला-एक गणेश मंडळ’ हा उपक्रम सुरू करणारे अशोकभाऊ आज विविध कंपन्यांचा समूह असलेल्या जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत. अशोकभाऊंचे हे मोठेपण त्यांचा ‘थोरले’ असण्याचा अधिकार दर्शविते. अशोकभाऊंच्या पुढील वाटचालीत त्यांना ‘थोरलेभाऊ’ ही उपाधी देण्याचा प्रस्ताव आहे. त्यांच्या कार्यातील चतुःसुत्री समजावून घेण्याचा प्रयत्न…

श्रद्धेय स्व. भवरलालजी जैन यांना जळगाव जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी ‘मोठेभाऊ’ ही उपाधी दिलेली होती. त्यांनी विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात दातृत्व, सहयोग, सहकार्य यासाठी दायित्व जबाबदारीने निभावले. त्यांची जागा कोणालाही भरून काढता येणे शक्य नाही. पण ‘मोठेभाऊ’ ही प्रेमाची उपाधी कालबाह्य न ठरता ती जाणीवपूर्वक पुढे वाहून न्यायला हवी. ‘मोठेभाऊ’ या शब्दातला मान, आब, अदब राखून ‘थोरलेभाऊ’ अशी उपाधी अशोकभाऊंना द्यायला हवी. सामाजिक कार्ये, उपक्रमांत दातृत्वाचा हात पुढे करणारे ‘थोरलेभाऊ’ असायलाच हवेत. ते नसले तर उणेपणाची, पोरकेपणाची रिकामी जागा असल्याचे जाणवेल. इतिहासाच्या पानांत डोकावले तर थोरलेपणाचा वसा आणि वारसा हा केवळ दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांच्या ठायी नोंदविला गेला आहे. पहिले म्हणजे थोरले बाजीराव. दुसरे म्हणजे थोरले शाहू महाराज. थोरले बाजीरावांच्या तलवारीचा पराक्रम एकही लढाई न हरलेला योद्धा म्हणून नोंदविलेला आहे. थोरले शाहू महाराज यांनी समाज आणि समूह कार्याची सकारात्मक दिशा महाराष्ट्राला दिली. या दोघांमधील ‘पराक्रम’ आणि ‘परोपकार’ या दोन गुणांचा सर्वोत्तम समन्वय उद्योजक म्हणून अशोकभाऊंच्या अंगी सुद्धा आहे. म्हणून अशोकभाऊंना ‘थोरलेपण’ देण्याचा मोह मला होतो.

असेही जैन परिवारात अशोकभाऊ थोरलेच आहेत. नातेसंबंधांच्या विस्तारीत ५०० वर जणांच्या परिवारातही अशोकभाऊंचा शब्द थोरल्या भावाचा म्हणून आवर्जून पाळला जातो. कंपनी क्षेत्रात त्यांची ओळख A1 अशीही आहेच. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला, धर्म अशा कार्यांतही अशोकभाऊंचा सहभाग व समावेश हा थोरलेभाऊ म्हणूनच आहे. येथे एक उल्लेख मुद्दाम करायला हवा. काव्यरत्नावली चौकात सर्व धर्मियांचे सण-उत्सव निमित्ताने ऐक्य व एकात्मतेचे संदेश देणारी सजावट आवर्जून केली जाते. ही अशोकभाऊंची मूळ कल्पना आहे. अशोकभाऊ हे स्वतः स्थानकवासी जैन आहेत. मूर्तिपूजा हा प्रकार त्यांच्यात नाही. पण पद्मालय येथील गणेश मंदिराच्या परिसर सौंदर्यीकरणाची जबाबदारी अशोकभाऊंनी स्वीकारलेली आहे. अशा विविध कार्यांचा वसा माणसातील थोरलेपण नक्कीच दर्शवितो. माझ्या दृष्टीने आणखी एक मुद्दा. श्रद्धेय स्व. ‘मोठेभाऊंचा’ वसा आणि वारसा अशोकभाऊंनी जपलेला आहेच. शक्य असेल तेथे कणभर का असेना जास्त देण्याची जबाबदारी अशोकभाऊ निभावत असतात. आहेत. म्हणून यापुढे अशोकभाऊंचा उल्लेख मी ‘थोरलेभाऊ’ म्हणून करणार आहे.

अशोकभाऊंना थोरलेपण देण्यासाठी त्यांच्या सामाजिक सेवेची चतु:सूत्री समजावून घ्यायला हवी. निसर्गातील वनस्पती, मानवासह प्रत्येक चराचराचा विचार करीत जैन परिवाराने उद्योगाची उभारणी केली. ‘ज्या समाजातून घेतो त्याला परतीचे देणे लागतो’ हा विचार उद्योग प्रारंभाच्या पहिल्या दिवसापासून अंगीकारला. श्रद्धेय स्व. भवरलालजी म्हणायचे, ‘हे जग मला जसे मिळाले त्यापेक्षा ते अधिक सुंदर करून माझ्या भावी पिढीकडे ते सोपविणार’. हाच विचार कृतीत आणत ते जगले आणि खरोखर अनेकांचे आयुष्य सुंदर, संपन्न करून त्यांनी निरोप घेतला. त्यांच्या पश्चात याच विचाराला कृतीची जोड देत अशोकभाऊ जबाबदारी निभावत आहेत. कार्य ‘मोठेभाऊं’चेच आहे. आम्हाला फक्त मोठेभाऊंऐवजी थोरलेपण अशोकभाऊंना द्यायचे आहे.

अशोकभाऊंच्या सामाजिक सेवेची चतुःसूत्री कोणती आहे, याकडे लक्ष वेधूया. ही चतुःसूत्री पूर्णतः जैन विचार आणि धर्माचरणाला अनुसरून आहे. देवादिके मंदिरात, स्थानकात न शोधता ती आपल्या कार्यातून इतरांसाठी जाणवावीत, हा दूरदृष्टीचा विचार या चतुःसूत्रीमागे आहे. ‘तो ऐनवेळी देवासारखा धावून आला’ याची अनुभूती होणे म्हणजे समाजाप्रती थोरलेपण निभावणे होय. अशोकभाऊंच्या कार्याचा लेखाजोखा मांडताना थोरलेपण अधोरेखित होत जाते.

अशोकभाऊंचे पहिले सूत्र आहे ते वैद्यकीय मदतीचे. उद्योग समूहातील, परिचित वर्गातील आणि समाजातील ज्या-ज्या गंभीर आजारांच्या, खर्चिक शस्त्रक्रियेच्या रुग्णांना मोठ्या रकमेची मदत हवी असते तेव्हा अशोकभाऊ दातृत्व निभावतात. समूहातील कित्येक जणांना वैद्यकीय सेवेची पुरेपूर मदत केलेली आहे. अपघातग्रस्तांचा सर्व खर्च उचललेला आहे. बहुतेक वैद्यकीय सेवेचा पूर्ण खर्च उचलायचा निर्णय अशोकभाऊ निभावतात. त्यांना एका सहकाऱ्याने विचारले, ‘आपण एकाच रुग्णाला संपूर्ण रक्कम देण्याऐवजी मर्यादित रक्कम दिली, तर जास्त रुग्णांना मदत करू शकू’. यावर अशोकभाऊंचे ‘थोरलेपण’ दर्शविणारे उत्तर आहे. ते म्हणाले, ‘आपल्याकडून होणाऱ्या मदतीने जर एखाद्याचा जीव वाचविण्याची क्रिया पूर्ण होत असेल, तर आपण त्यात परोपकार मानावा. शेवटी तेच खरे मानवकल्याणाचे कार्य आहे’.

अशोकभाऊंचे दुसरे सूत्र आहे ते गरजवंतांसाठी पुरेसे भोजन. ‘कोरोना’ महामारीच्या काळात संपूर्ण भारत बंद असताना अनेकांचे रोजगार ठप्प झाले. रोज दोनवेळच्या भोजनाची परवड होऊ लागली. अशावेळी ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम हाती घेऊन रोज दोनवेळ शेकडो अन्न पाकिटांचे वाटप शहरात सुरू होते. काही गरजवंतांना अशा पद्धतीने अन्न पाकिटे घेण्यात मान भंग वाटू नये म्हणून त्यांना गरजेपुरता किराणा साहित्य देण्याचाही निर्णय अशोकभाऊंनी अमलात आणला. ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम आता बारा महिने सुरू असून, जळगाव शहरात कोणीही उपाशी असू नये, ही या उपक्रमामागील ‘थोरलेपण’ निभावणारी भूमिका आहे. आजही रोज शेकडो अन्न पाकिटे शहरात वितरीत होतात.

अशोकभाऊंचे तिसरे सूत्र आहे ते उच्च शिक्षणासाठी मदत. श्रद्धेय स्व. मोठेभाऊंनी ‘अनुभूती’ शाळांचा प्रारंभ सर्वांसाठी उत्तम शिक्षण ही दूरदृष्टी ठेवून केला. केवळ आपल्याच शाळेत शिक्षण देणे हा संकुचित विचार बाजूला ठेवून इतर महाविद्यालयांमधील हुशार, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याची जबाबदारी वेळोवेळी स्वीकारली. उद्योग समूहातील अनेक कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. परदेशात जाण्याची संधी आली तेव्हा गरज असेल ती मदत दिली. शिक्षणात क्रीडाविषयक मदतीचाही उल्लेख करता येईल. खेळाडू असलेल्या युवक-युवतींनाही खेळाचे प्रशिक्षण, स्पर्धा यात सहभागासाठी मदत करणे सुरूच असते. थोरल्या भावाशिवाय असे सहकार्य कोण करते?

अशोकभाऊंचे चौथे सूत्र आहे ते प्रचंड जनसंपर्क. वेगवेगळ्या क्षेत्रांतील आणि वयोगटांतील कोणताही आर्थिकस्तर असलेली मंडळी अशोकभाऊंच्या सहज संपर्कात येते. देशभरातील बडे राजकारणी, मान्यवर उद्योगपती, व्यावसायिक यांच्याशी व्यक्तिगत ओळख अशोकभाऊंची आहे. जैन परिवाराविषयी स्नेह असलेले सतत संपर्कात असतातच; पण जैन उद्योग समूहाविषयी गैरसमज वा दुस्वास असलेल्या मडळींशीही चर्चेचे द्वार खुले असते. हा अशोकभाऊंमधील दुर्मिळ गुण आहे. समाजात थोरलेपण मिळवायचे तर विरोधकालाही त्याची बाजू आपल्यासमोर मांडू देत. त्यावर आपण वस्तुस्थिती स्पष्ट करू, हे अशोकभाऊंचे व्यक्तिगत नियोजन. कित्येक विरोधकांना त्यांनी स्वतः बोलावून, बसवून व सोबत भोजन करून त्यांचे गैरसमज स्नेहात रूपांतरीत केले आहेत. ‘कोरोना’ महामारीच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेत सर्वजण भयभीत असताना अशोकभाऊ परिचितांशी मोबाईलवर संपर्क करून विचारपूस करीत होते. ज्याला कशाची गरज असेल ती पुरविण्यासाठी पुढाकार घेत होते. थोरलेपण निभावणे यालाच तर म्हटले जाते.

अशोकभाऊ यांचा उल्लेख यापुढील लेखांमध्ये ‘थोरलेभाऊ’ म्हणून करणार. अशा प्रेमाच्या उपाधीसाठी परवानगीची गरज नाहीच! थोरलेभाऊ तुम्ही औक्षवंत व्हा, कीर्तीवंत व्हा. अनेकांचे पोशिंदे, तारणहार व्हा..!

-दिलीप तिवारी, जळगाव (लेखक जळगावचे जेष्ठ पत्रकार आहेत.)

हे देखील वाचा :