⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | नगरदेवळा शिवारातील विहिरीत पडून सैनिकाचा मृत्यू ; परिसरात खळबळ

नगरदेवळा शिवारातील विहिरीत पडून सैनिकाचा मृत्यू ; परिसरात खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । भडगाव तालुक्यातील पिंप्रीहाट येथील रहिवाशी व नासिक येथे सैन्यात पी. टी. प्रशिक्षक पदावर सेवेत असलेल्या २६ वर्षीय जवानाचा पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा शिवारातील विहरित आज शनिवारी दुपारी मृतदेह आढळून आला. प्रमोद दिनकर पाटील (वय – २६) असे या मृत जवानाचे नाव असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जवानाचा मृतदेह तब्बल ३३ तासांनंतर आढळून आला असून घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जवानाचा १६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील युवतीशी विवाह झाला होता. जवानाच्या मृत्यूमुळे पिंप्री हाट व तारखेडा या दोन गावांवर शोककळा पसरली आहे. अक्षय तृतीयाच्या आधल्या दिवशी भडगाव व जळगाव पोलिसांनी याच परिसरात जुगार अड्यावर छापा टाकून ३१ दुचाकींसह ८ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली होती. त्या घटनेचा जवानाच्या मृत्यूशी काही संबंध आहे की काय? याबाबत उलट सुलट चर्चा असून याबाबतचे खरे वृत्त पोलिसांच्या चौकशीनंतरच बाहेर येणार आहे.

प्रमोद पाटील हा २०१६ मध्ये सैन्यात भरती झाला होता. त्यानंतर नाशिक येथील पी. टी. सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणून गेल्या २ वर्षांपासून सेवा देत असतांना ४ मे रोजी त्याच्या चुलत भावाचा विवाह असल्याने तो ३ मे रोजी पिंप्री हाट येथे विवाहासाठी आला होता. यानंतर एक जूनला सुटी संपणार असल्याने प्रथमच पत्नीला नाशिक येथे सोबत घेऊन जाण्याचे स्वप्न त्याने रंगविले होते. मात्र दैवाला ते मान्य नसल्याने तो गुरुवारी सायंकाळी कोणास काही एक न सांगता घराबाहेर निघून आला.

दरम्यान नगरदेवळा शिवारातील छबुलाल भिका चौधरी हे शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या शेतातील विहरीजवळ गेले असता त्यांना एक पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगत्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी घटनेबाबतची माहिती नगरदेवळा ता. पाचोरा दुरक्षेत्राच्या पोलिसांना कळविली. दरम्यान प्रमोद पाटील हा घरी न असल्याने त्याच्या घरच्या मंडळी त्याचा शोध घेत फिरत होते. प्रमोद पाटील यांचा चुलत भाऊ समाधान संतोष पाटील हा घटनास्थळी पोचल्याने त्याने आपला चुलत भाऊ प्रमोदच असल्याचे ओळ्खल्यानंतर जोराने हंबरडा फोडला. घटनेबाबत समाधान पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मयताचे पश्चात आई, वडील, पत्नी, १ भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.