जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२६ । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात महापुरुषाच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर अज्ञात समाजकंटकाने फाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शिरसोली परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समाजबांधवांनी बस स्थानक परिसरात तब्बल एक तास ठिय्या आंदोलन केले.

नेमकी घटना काय?
शिरसोली येथील बस स्थानक परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारे बॅनर लावण्यात आले होते. आज शनिवारी हे बॅनर फाडल्याचे निदर्शनास येताच परिसरात संतापाची लाट उसळली. या घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाजबांधव घटनास्थळी जमा झाले.

बॅनर फाडणाऱ्या विकृत प्रवृत्तीचा निषेध करत आंदोलकांनी बस स्थानकावरच ठिय्या मांडला. “जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही,” असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाकडे तातडीने तपासाची मागणी केली.
पोलीस प्रशासनाची मध्यस्थी
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संतापलेल्या समाजबांधवांची समजूत काढत, “आरोपीचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. या आश्वासनानंतर समाजबांधवांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
सध्या गावात शांतात असून याप्रकरणी समाजबांधवांकडून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्याची माहिती आहे. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून, नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








