जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनींचे पंचनामे करण्यात येणार नाहीयेत. ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असता, तर नियमानुसार पंचनामे झाले असते. आता पंचनामे होणार नाहीत, असे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी पहाटे ३ ते ६ या काळात जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात तुफान पाऊस झाला. अवघ्या तीन तासांत ५५ मिमी पाऊस पडल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. पातोंडा मंडळातील सावखेडा भागात अधिक नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असली, तरी मंडळात ५५ मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.
शासनाच्या नियमानुसार ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास नुकसानीचे पंचनामे केले जातात. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी आता शासकीय मदतीपासून वंचित राहणार आहेत. शेतांचा पंचनामा करण्यात यावा, अशी अपेक्षा या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पाचोऱ्यात पाऊस, मात्र नद्यांना एकदाही पूर नाही
पाचाेरा तालुक्यात १२ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती; मात्र सोमवारी दुपारी अडीच वाजता तासभर जोरदार पाऊस झाला. दरम्यान, तालुक्यातील हिवरा, बहुळा, अग्नावती नद्या पुराच्या प्रतीक्षेत आहेत. तर घोडसगाव, पिंपळगाव, सातगाव डोंगरी, सार्वे पिंपरी, डांभुर्णी पिंप्री, अटलगव्हाण, कोल्हे, दिघी, गाळण, निपाणे, खाजोळा, बदरखे, मोहलाई, म्हसाळा, कोकडी, लोहाला, गारखेडा या सर्व प्रकल्पांमध्ये अद्यापही जलसाठा वाढलेला नाही. तालुक्यातील गिरणा नदीपात्राच्या लगत ८० ते ८५ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.