जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । मोबाईल गेमच्या नादात काही वेडे झाले तर काहींनी खून केले. काहींनी आत्महत्या केली तर कुठे हाणामारी झाल्याचे प्रकार आपण नेहमीच ऐकले आहेत. पुणे पोलिसांनी एका तरुणाला चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक केली असून त्याने दिलेल्या माहितीने पोलीस देखील विचारात पडले आहेत. मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन आणि त्यात मोबाईलच नसल्याने तरुण गुन्हेगारीकडे वळला व महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन पोबारा केला होता.
मोबाईलच्या जमान्यात दररोज कितीतरी गेम बाजारात येत असतात. मध्यंतरी तर ब्लू व्हेल या गेममुळे अनेकांना जीव गमवावा लागला. सध्या पबजी, फ्री फायर, कँडी क्रश सारख्या गेमची मोठी चलती आहे. मोबाईल आणि नेट असले कि गेमवेडे तासंनतास त्यावर पडून असतात. पुणे शहरात एक नवीन घटना समोर आली असून चक्क गेम खेळायला मोबाईल नसल्याने तरुणाने सोनसाखळी चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी संशयीत तरुणाला अटक केल्यावर तपासात त्याने हि माहिती दिली आहे.
पुणे शहरातील राजगुरू नगरात दोन दिवसांपूर्वी एका पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावत दुचाकी चालक तरुणाने पळ काढल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पुढील तपासाला पोलिसांनी सुरुवात केली होती. दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी शोध घेतला असता पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी धीरज जाधव यांना अजय राजू शेरावत वय-१८ रा.हिंगणगाव ता.शिरूर या तरुणाबद्दल माहिती मिळाली होती.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, अतुल डेरे, विजय कांचन, अमोल शेडगे आदींनी कारवाई करीत अजय शेरावत याच्या मुसक्या आवळल्या होत्या. अजयला मोबाईल गेम खेळायची प्रचंड आवड आणि सवय होती. गेम खेळायला मोबाईल नसल्याने त्याने चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. दागिने विक्री केल्यावर येणाऱ्या पैशातून तो मोबाईल घेणार असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.