जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना ४० टक्के स्वस्त वीज मिळणे शक्य आहे. महाराष्ट्रातील लघु व मध्यम उद्योगांना सोलर एनर्जीच्या माध्यमातून स्वस्त वीज मिळणार आहे. त्यामुळे राज्यामधील औदयोगिक क्षेत्रात नवीन क्रांती होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरमध्ये आणि महाराष्ट्र सरकारचा उपक्रम असलेल्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित ( महाप्रीत ) यांच्यात बुधवारी सांमजस्य करारावर स्वाक्षरी झाली. त्या वेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रतिपादन केले.
‘महाप्रीत’चे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी , महाप्रीतचे संचालक पुरुषोत्तम जाधव, चीफ जनरल मॅनेजर दीपक कोकाटे यांच्या हस्ते सामंजस्य करार झाला. दोन्ही संस्थातील कराराने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमई) सह स्वस्त दरात वीज उपलब्धेतसह आर्थिक विकास, नवनिर्मितीला प्रोत्साहन आणि उद्योगांची स्पर्धात्मकता वाढीला बळ मिळणार आहे.
या वेळी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, रवींद्र माणगावे, शुभांगी तिरोडकर, कांतीलाल चोपडा, श्रीकृष्ण परव, सेक्रेटरी जनरल सागर नागरे, सचिव नितीन भट्ट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, या दोन्ही संस्थात झालेल्या सामंजस्य करारानुसार एमएसएमईला मोठी चालना मिळणार आहे. वीज दरवाढीच्या प्रश्नांमध्ये राज्यातील उद्योगांना दिलासा देता येईल, अशी महत्त्वपूर्ण सुरुवात महाराष्ट्र चेंबरने केली आहे.राज्यातील उद्योगांना सध्या द्याव्या लागणाऱ्या वीज दरामध्ये 40% पर्यंतची सवलत मिळेल, अशा पद्धतीने रूफ-टॉप सोलर च्या माध्यमातून एक नवी क्रांती घडविली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारचा उपक्रम असलेल्या महाप्रीत व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या दरम्यान एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. राज्यातील लघु व मध्यम उद्योगांना स्वतः कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक न करता एका विशेष व्यवस्थेमध्ये रूट ऑफ रफ-टॉप सोलरची यंत्रणा उभारून किमान 40 टक्के कमी दरामध्ये वीजपुरवठा होईल. यामध्ये जागतिक बँकेचा आर्थिक सहभाग आहे.
अधिक माहिती देताना ललिल गांधी म्हणाले, विशेषत : एमएसएमईला लागणारी वीज ही महाराष्ट्रात १० ते १२ रुपये प्रतियुनिट दराने विक्री केली जाते. त्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा ४० टक्के खर्च हा वीजेवर होतो. हा वीजेचा भार कमी करण्यासाठी प्रामुख्याने सोलर, रुफ टॉप सोलरसाठी प्रचार केला जाणार आहे. सोलर एनर्जीच्या माध्यमातून प्रतियुनिट सुमारे पाच रुपये दराने वीज उपलब्ध होऊ शकेल. त्याचा फायदा होणारा उत्पादन खर्चात होणार असून अन्य राज्याच्या उत्पादनाच्या खर्चात आणि स्पर्धेत टिकण्यास मोठी मदत होईल, हा प्रमुख मुख्य उद्देश महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि महाप्रीत या संस्थेत झालेल्या करारामध्ये आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकारतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती ‘महाप्रीत’चे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी , महाप्रीतचे संचालक पुरुषोत्तम जाधव, सीजीएम दीपक कोकाटे यांनी दिली.