भुसावळात शांतीनगर परिसरातील हिरव्यागार वृक्षांची कत्तल
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील शांतीनगर परिसरात हिरव्यागार वृक्षांवर कुर्हाड चालवण्यात आल्याने वृक्षप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण व्यक्त केले आहे. या प्रकरणी काही वृक्ष प्रेमींनी अधिकार्यांना माहिती दिल्यावर वृक्ष तोडणार्यास शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
परवानगी विनाच वृक्षांची कत्तल
शहरातील शांती नगरात टेक्निकल हायस्कूलच्यामागे रस्त्यावर असलेले सप्तपर्णीचे झाड पालिकेची कुठलीही परवानगी न घेता कापले जात असताना पत्रकार, वृक्षप्रेमी यांनी हा प्रकार पाहताच त्यास मनाई केली तसेच नागरीकांनीदेखील या प्रकारास विरोध केला मात्र संबंधितांनी न जुमानता उलट वाद घातला. गुरूवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडल्यानंतर वन्यजीव संरक्षण संस्थेचे मानद उपाध्यक्ष सतीश कांबळे यांनीही वृक्ष तोडीला विरोध केला मात्र तेथील लोकांनी ऐकले नसल्याने त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रवींद्र बाव्स्किर यांना माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळावर येत वृक्ष तोड करणार्याला ताब्यात घेत, त्याचे साहित्य सुध्दा जप्त करण्यात आले.