श्रीराम रथोत्सव : ६ तासात आटोपणार मिरवणूक, आज रंगरंगोटी
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । श्रीराम रथोत्सवाचे यंदा १५ नोव्हेंबर रोजी आयाेजन करण्यात आले आहे. त्यानुसार तयारीला वेग आला असून, शनिवारी रथावर पालिकेच्या बंबाद्वारे पाणी मारून साफसफाई करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रथोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी यंदा रथ मार्गात भजने, भारुड, बॅण्ड आदींचा काही प्रमाणात अभाव असणार आहे. मात्र, श्रीराम मंदिरात नित्यपूजेस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे कमी गर्दीच्या वातावरणात मर्यादित प्रमाणात रथोत्सव साजरा करण्याचा निर्णय रथोत्सव समितीतर्फे घेण्यात आला आहे.
मिरवणूक ६ तासांची
गेल्या वर्षी मिरवणुकीसह सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. तर रथदेखील केवळ पाच पावले ओढण्यात आला होता. यंदा मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने रथोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. रथोत्सवात जास्त गर्दी होऊ नये, यासाठी समितीला कार्य करावे लागणार आहे. यंदा मिरवणुकीची वेळ सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.३० अशी सहा तासांची असणार आहे. रथ सुरू असताना आरती व प्रसाद वाटण्यावर निर्बंध असून, भाविकांनाही गर्दी न करता, लांबूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. तसेच रथोत्सवापुढील भजन, भारूड, सोंगाचीही गर्दी टाळली जाईल.