जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । भडगाव येथील श्रीराम रथ उत्सव समितीच्या वतीने काेराेना काळातील दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर यावर्षी मोठ्या जल्लोषात आज राेजी रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
रथोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरुन श्रीरामांची मूर्ती ठेवलेल्या रथाची एकादशी अर्थात १२ एप्रिलला मिरवणूक निघणार आहे. भडगावचा श्रीराम रथोत्सव नवसाला पावणारा असल्याची ख्याती आहे. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत भव्य श्रीराम मंदिर असून येथे राम नवमीला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. तर एकादशीला श्रीरामांचा रथ शहरातील प्रमुख मार्गावर मानवी शक्तीने ओढला जातो. जवळपास १५० वर्षापूर्वी स्वर्गीय शंकर आत्माराम वाणी यांनी बाजारपेठेत श्रीराम मंदिर बांधून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांनी रथोत्सव साजरा करण्यास सुरुवात केल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. पारोळा येथील कारागीर स्वर्गीय माधव रामजी मिस्तरी यांनी हा रथ तयार केला होता, असे सांगितले जाते. श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा पूर्वीपासून स्वर्गीय बापू शंकर वाणी व स्वर्गीय निंबा शंकर वाणी यांच्या परिवाराकडे आहे.
असा सजवला जाताे रथ
१५० वर्षाची परंपरा असलेल्या रथावर श्रीराम, लक्ष्मण, सीता माता यांच्या मुर्ती स्थापन करुन सारथी दोन घोडे, भालदार, चोपदार तर रथाच्या मागील बाजूस अहिरम, बहिरम व रथावर हनुमान याचे लाकडी पुतळे ठेऊन रथ सजवला जातो. बारा-बलुतेदार समाज, विविध सामाजिक संघटना, शहरातील विविध मंडळ व तरुणांच्या मदतीने रथ शहरातील प्रमुख मार्गावर ओढला जातो. रथास मोगऱ्या लावण्याचे काम तरुण करतात. तर रथोत्सव साजरा करण्याची जबाबदारी गावातील रथ उत्सव समितीकडे आहे.
भडगावात येथील रथाेत्सवानिमित्त रथाची केलेली स्वच्छता.