गोळीबार प्रकरण : पसार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांकडून शोध

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२३ ।  पूर्व वैमनस्यातून भुसावळातील दोघा तरुणांवर झालेल्या गोळीबाराने भुसावळ पुन्हा एकदा हादरले असून गुन्हेगारी पुन्हा ऐरणीवर आली आहे. साकरी-फेकरी रेल्वे उड्डाणपुलाजवळील रस्त्यावर भुसावळातील दोघा तरुणांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याची घटना घडल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी शनिवारी सकाळी खडका, ता.भुसावळ येथील तिघा संशयीतांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गोळीबारानंतर पसार झालेल्या संशयीतांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन झाडलेल्या गोळींच्या रीकाम्या पुंगळ्या तसेच एक जिवंत काडतूस जप्त केले असून गोळीबारात जखमी झालेल्या दोघा तरुणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ओव्हरटेक करीत महामार्गावर झाडल्या गोळ्या
सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (25, भुसावळ) व त्यांचे दोघे मित्र चारचाकी स्वीप्ट (एम.एच.19 डी.व्ही.0071) ने वरणगावकडे जेवणासाठी निघाल्यानंतर एकाच दुचाकीवरून आलेल्या तीन संशयितांनी स्वीप्टला ओव्हरटेक करीत चारचाकी साकरी-फेकरी रेल्वे उड्डाणपुलाजवळील रस्त्यावर अडवली. यावेळी करण सपकाळे या संशयीताने गोळी झाडल्यानंतर ती अक्षयच्या पोटाला तर मंगेशच्या छातीला लागली. अचानक झालेल्या घटनेनंतर तरुणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली व ते जखमी अवस्थेत शेतात लपून बसले. यानंतर संशयित हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.

पोलिसांची धाव ः जिवंत काडतूस जप्त
गोळीबार झाल्यानंतर अक्षय व मंगेश सोबतच्या मित्रांनी भुसावळ तालुका पोलिसांना गोळीबार झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत सुरूवातीला अक्षयला जखमी अवस्थेत गोदावरी रुग्णालयात हलवले मात्र मंगेश हा शेतात लपून असल्याने पोलिसांचे पथक पुन्हा माघारी शेतात वळले मात्र त्याचा शोध लागत नसल्याने मोबाईल कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून रात्री त्या मोबाईलचे लोकेशन काढल्यानंतर जखमी मंगेशलाही गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळावरून जखमींची कार भुसावळ तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रात्री अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तालुका निरीक्षक विलास शेंडे, सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे व सहकार्‍यांनी पाहणी केली. घटनास्थळावरून पोलिसांनी झाडलेल्या दोन गोळ्यांच्या रीकाम्या पुंगळ्या व एक जिवंत काडतून जप्त केले आहे.

गोळीबाराला वैमनस्याची किनार ः जखमी तरुणांविरोधात गुन्हे
दोघा तरुणांवर गोळीबार झाल्याच्या घटनेने भुसावळसह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादानंतर तरुणांवर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाल्यानंतर त्यांचा पोलिसांकडून त्यांचा रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला मात्र दुसर्‍या दिवशीही शनिवारी संशयीतांचा शोध लागला नाही. जखमी अक्षय विरोधात खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा तसेच मंगेशविरोधात चोरी व घरफोडीचा गुन्हा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

तिघांविरोधात गुन्हा ः संशयित पसार
गोळीबार प्रकरणी धीरज प्रकाश सोनवणे (36, पाण्याच्या टाकीजवळ, खडक, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून संशयित करण संतोष सपकाळे, संतोष शंकर सपकाळे, जीवन रतन सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर तीन्ही संशयित पसार झाले असून त्यांचा स्थानिक पोलीस प्रशासनासह गुन्हे शाखेकडून शोध सुरू करण्यात आला आहे. संशयित खडका गावातील असलेतरी स्थानिकांना त्यांच्याबाबत फारशी माहिती नाही शिवाय सहा महिन्यांपूर्वीच संशयित गावातून निघून गेल्याची माहिती आहे.