बुधवार, ऑक्टोबर 4, 2023

ब्रेकिंग न्यूज : मुंबई-जयपूर ट्रेनमध्ये प्रवाशांवर गोळीबार; चौघांचा मृत्यू

मुंबई | जयपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जयपूर एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. रेल्वे सुरक्षा दलातील एका जवानाने पालघर रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशांवर गोळीबार केल्याने चौघांचा मृत्यू झाला. ऑटोमॅटिक हत्यारेने जवानाने फायरिंग केली. पालघर रेल्वे स्टेशन ओलांडल्यानंतर आरपीएफ जवानाने चालत्या ट्रेनमध्ये बोगी नंबर ४ आणि ५ मध्ये फायरिंग केली. त्यात आरपीएफ एएसआय आणि अन्य ३ प्रवाशांना गोळ्या लागल्या.

प्राप्त माहितीनुसार, रेल्वेतील आरपीएफ कॉन्स्टेबल आणि एएसआय यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. दोघांमधील वाद इतका वाढला की आरोपी कॉन्स्टेबलने आपली रायफल काढून गोळीबार सुरू केला. या घटनेत एएसआयसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर साखळी खेचून बोरिवली स्टेशनजवळ त्याने उडी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला परंतु जीआरपीने आरोपी आरपीएफ जवानाला हत्यारासह ताब्यात घेतले.

या घटनेवेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, सुरुवातीला आम्हाला काहीच समजले नाही. ट्रेनमध्ये अचानक गोळीबार होऊ लागला. सर्वत्र गोंधळ उडाला. प्रवाशी ट्रेनच्या बोगीमधून इकडून तिकडे सैरावैरा पळू लागले. काही प्रवाशांनी त्यांच्या मुलांना लपवले तर काहींनी सामान घेऊन पळ काढला. अनेकांना हा दहशतवादी हल्ला असल्याचे वाटले. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर प्रवासी इतके घाबरले होते की, त्यांना काहीच समजत नव्हते. बोरिवलीजवळ ट्रेनचा वेग कमी झाला तेव्हा काही प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या घेतल्या.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरपीएफ जवान मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. कॉन्स्टेबल चेतन कुमार चौधरी याने त्याच्या एस्कॉर्ट ड्युटी इनचार्ज एएसआय टिका राम मीना यांना चालत्या ट्रेनमध्ये गोळ्या घातल्या. आपल्या सिनियरला गोळ्या घालल्यानंतर तो दुसऱ्या बोगीत गेला आणि तीन प्रवाशांना गोळ्या घातल्या.