जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । मी आता धुळे येथून निघालो आहे. पहाटे ३ वाजेपर्यंत घरी बोदवडला येतो, असे दत्त नगरात शुभम नंदू माळी (वय २६) या मुलाने आईला रविवारी रात्री ११ वाजता फोन करून सांगितले. मात्र, तो उशिरापर्यंत घरी आला नाही. यानंतर सोमवारी जामनेरजवळ त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याच्या बातमीने बोदवड येथील माळी कुटुंब हादरले. दरम्यान, हा प्रकार अपघात की घात? असा प्रश्न असून पोलिसांना तपासाचे आव्हान आहे.
बोदवड शहरातील दत्त नगरात शुभम नंदू माळी (वय २६) हा आपली विधवा आई प्रमिलाबाई माळी यांच्यासह राहतो. तो आयशर वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास जामनेर शहराजवळील कांग नदीच्या पुलाखाली त्याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह व दुचाकी (क्रमांक एमएच.१९-डीएस.२६४१) आढळली. त्याचा चेहरा व डोक्याला गंभीर मार लागल्याचे समोर आले. दरम्यान, शुभम हा पहूर येथून धुळे व इतरत्र भाजीपाल्याची ने-आण करायचा. रविवारी रात्री ११ वाजता शुभमचे त्याची आई प्रमिलाबाई यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले. त्यावेळी शुभमने सांगितले की, मी आता धुळे येथून निघालो आहे. पहाटे तीन वाजेपर्यंत बोदवड येथे येईल. मात्र, तो घरी परत आलाच नाही. शुभमने आपले मोठे वाहन पहूर येथे लावून दिले. नंतर तो दुचाकीने बोदवडकडे येत होता. मात्र, सोमवारी सकाळी जामनेर शहराजवळील कांग नदी पात्रातील पुलाखाली एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला. घटना स्थळापासून काही अंतरावर दुचाकी व बॅग देखील आढळली. ही माहिती नागरिकांनी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना दिली. यानंतर दुचाकीवरून ओळख पटली. हा मृतदेह शुभम माळी याचा असल्याचे समोर आले. त्याची दुचाकी मृतदेहापासून पन्नास फुटांच्या अंतरावर आढळली. तसेच शुभमचा मोबाईल देखील गायब होता. शुभमच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
दुचाकीवरून पटली मृताची ओळख
पोलिसांना प्रथम तरुणाची ओळख पटली नाही. मात्र दुचाकीचा क्रमांक (एम.एच.१९-डी.एस.२६४१) ऍपवर टाकताच ती बोदवड तालुक्यातील वरखेड येथील शंकर ईश्वरसिंग पाटील यांच्या नावावर असल्याचे दिसून आले. पाटील यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, दुचाकी शुभम माळी याच्याकडे ३० हजार रुपयांत गहाण ठेवली असल्याचे समोर आले. त्यावरून शुभम माळी हा बोदवडच्या दत्त नगरातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.
पुलावर रक्ताचे डाग, सुटे पैसेही पडलेले आढळले
मृत शुभम हा पहूर येथील गाडीवर चालक म्हणून काम करत होता. तो पहूर कडून बोदवडकडे जात होता. नदीपात्रात मृतदेह पडलेला होता त्याच ठिकाणी पुलावर आणि कठड्यावर रक्ताचे डाग होते. याचा अर्थ शुभम खाली पडण्यापूर्वीच त्याच्या डोक्याला मार लागलेला होता, हे स्पष्ट होते. खिशातील काही सुटे पैसे पुलावर पडलेले होते. कठडे चार फूट उंच असताना शुभम खाली कसा पडला? असा प्रश्न आहे. त्यामुळे घातपाताचा संशय बळावला आहे.
हे देखील वाचा :