धक्कादायक ! रेल्वेतुन महिलेचे सव्वाआठ लाखांचे दागिने लंपास
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । अप गाेरखपूर-एलटीटी (१२१६६) एक्स्प्रेसने एसी फर्स्टच्या डब्यातून महू ते ठाणे प्रवास करताना दाम्पत्याच्या झोपेचा गैरफायदा घेत चाेरट्याने त्यांची पर्स लांबवली. त्यात दहा हजार रुपये राेख आणि साेन्याचे दागिने मिळून ८ लाख २६ हजारांचा ऐवज होता. बुधवारी (दि.१३) भुसावळ ते जळगाव दरम्यानच्या या चोरीप्रकरणी गुरुवारी मनमाड येथे गुन्हा दाखल होऊन तो भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग झाला.
फिर्यादी उषारॉय रामश्रय रॉय (रा. प्लॉट नंबर ४०४, हिरानंदानी इस्टेट, पोरबंदर, पाथर्डी फाटा, ठाणे) ही महिला त्यांचे पती रामश्रय रॉय यांच्यासह बुधवारी (दि.१३) अप १२१६६ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेसच्या एसी कोच ए-१ बोगीतील बर्थ क्रमांक २७ व २९ वरून महू ते ठाणे प्रवास करत हाेत्या. भुसावळ ते जळगाव स्थानकांदरम्यान या दाम्पत्यास झोप लागली. हीच संधी साधून चोरट्यांनी महिलेची पर्स लांबवली. त्यात १० हजार रुपये राेख, दोन लाख रुपये किमतीचा व पाच तोळे वजनाचा सोन्याचा हार, एक लाख रुपये किमतीची व अडीच तोळे वजनाची चेन, एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र, कर्णफुले, झुमके, सोन्याच्या बांगड्या असा मुद्देमाल होता.