⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | धक्कादायक! अंगावर खाजकुयरी टाकून पाच लाख लंपास

धक्कादायक! अंगावर खाजकुयरी टाकून पाच लाख लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । चोपडा शरातील जुना शिरपूर रोडवरील स्टेट बँकेतून रोकड काढून गॅस एजन्सीकडे निघालेल्या मॅनेजरच्या अंगावर, खाज आणणारी वनस्पती टाकून चोरट्याने, त्यांच्या ताब्यातील पाच लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. ३१ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास लोहाना पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत नोंद झाली असून चोरटा हा परिसरातील एका दुकानाच्या सीसीटिव्हीत कैद झाला आहेे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चोपडा शहरातील हॉटेल योगी जवळील इंडियन गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये केशरलाल मोतीलाल पाटील (वय ४५, रा.गरताड) हे मॅनेजर आहेत. मंगळवारी दुपारी पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी रमेश सोनवणे हे दोघे दुपारी ३.२५ वाजता, शहरातील जुना शिरपूर रोडवरील स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी दुचाकीवर (क्र.एम.एच.१९-डी.पी.०९१३) गेले होते. बँकेतून पैसे काढून घेतल्यानंतर साडेचार वाजेच्या सुमारास दोघे एका सोनाराकडे गेले. त्यानंतर डॉ. आंबेडकर चौकात ते आंबे घेण्यासाठी थांबले होते. आंबे घेतल्यानंतर मुख्य बाजारपेठेतून पुढे शिवाजी चौक आणि पुढे लोहाना पेट्रोल पंपाजवळील एका स्टॉलवर ते चहा पिण्यासाठी थांबले. रमेश सोनवणे हे दुचाकी लावून एकटे पुढे गेले. तर केशरलाल पाटील हे पैशांची बॅग घेऊन दुचाकीवरच बसले होते.

त्याचवेळी त्यांच्या मानेजवळ अचानक खाज सुटली. पाटील हे मान चोळत असताना ३५ वर्षीय अज्ञात संशयित त्यांच्याजवळ आला. तसेच तुमच्या मानेवर खूप मुंग्या आहेत, असे तो हिंदीत म्हणाला. तसेच चहाच्या स्टॉलवरून संशयिताने पाण्याचा जग भरूण आणत पाटील यांच्याकडे दिला. पाटील यांनी मान धुण्यासाठी आपल्या हातातील रोकड असलेली बॅग दुचाकीच्या डिकीवर ठेवली. तसेच ते खाली वाकून मान धुवू लागले. त्याचवेळी पाणी आणणाऱ्या अज्ञात संशयिताने दुचाकीवरील पैशांची बॅग उचलून तो पळून जाऊ लागला. पाटील यांनीही त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर दुचाकी घेऊन दुसरा संशयित उभा होता. पैशांची बॅग घेऊन पळणारा संशयित त्याच्या पाठीमागे बसल्यानंतर दोघे भरधाव वेगाने पसार झाले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह