⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Shivsena Update : संजय सावंत जळगावचे सुभाष देसाई होणार का?

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. उद्धव ठाकरेंनी यावेळी सुभाष देसाई या शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्याचे भरभरून कौतुक केले. सुभाष देसाई हे नाव जळगाव जिल्ह्यासाठी अपरिचित मुळीच नाही. ते जळगाव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख असतानाच शिवसेनेने जळगाव जिल्ह्यात खऱ्या अर्थाने आपली मूठ रोवली आणि आता हीच भूमिका संजय सावंत यांना देखील वठवायची आहे. जिल्ह्यातील पाचही आमदार शिवसेनेशी बंडखोरी करून शिंदे गटात गेले आहेत आणि आता नाही म्हटलं तरी शिवसेनेला जळगाव जिल्ह्यात खिंडार पडल आहे आणि हेच खिंडार भरून काढण्यासाठी संजय सावंत यांना मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत.

सुभाष देसाई यांनी काढलेला तडीपार मोर्चा प्रत्येका शिवसैनिकांच्या मुखात आहे. कारण त्यावेळी खऱ्या अर्थानं शिवसैनिकांवर जो अन्याय होत होता त्याविरोधात सुभाष देसाई जिल्ह्यात ठामपणे उभे होते. सध्या शिवसैनिकांवर अन्याय होत जरी नसला तरी सत्ता गेल्यावर शिवसैनिकांवर अन्याय होईलच, हे आता शिवसैनिकांना देखील माहिती आहे. शिवसैनिक केसेस घ्यायला देखील तयार आहेत. मात्र त्यांना आता चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. तेच नेतृत्व संजय सावंत यांनी करणे गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता शिवसैनिकांचे बाप म्हणून तर कधी आईच्या मायेने शिवसैनिकांना जिल्ह्यात वाढवायचे काम आता संजय सावंत यांना करावे लागणार आहे.

12 जुलै 1942 साली सुभाष देसाई यांचा जन्म झाला. मूळचे मुंबईकर असणारे सुभाष देसाई यांना बाळासाहेबांच्या विचारांनी वेड लावलं आणि ते बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक बनले. त्यांच्यातला खरा कार्यकर्ता आणि माणसं ओळखण्याची असलेली जाण बघून बाळासाहेब ठाकरे यांनी सुभाष देसाई यांना शिवसेनेचं नेतेपद बहाल केलं. या नेते पदाची धुरा त्यांनी अतिशय कुशल पद्धतीने सांभाळली. बाळासाहेब त्यांच्याकडे जबाबदारी द्यायचे आणि सुभाष देसाई ती जबाबदारी लीलया पार पाडायचे हीच सुभाष देसाई यांची खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये ओळख बनली. 1990 साली ते विधानसभेमध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 2004 व 2009 साली ते आमदार म्हणून निवडून गेले. 2014 साली त्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद देत विधान परिषदेवर निवडून आणले. २०१९ साली त्यांची विधानपरिषदेतील आमदारकिची टर्म संपली.

सुभाष देसाई ज्यांना शिवसैनिक आपुलकीने देसाई काका असेही म्हणतात त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांवर अन्याय होत असताना या अन्यायाची वाचा फोडायचे काम केले. संजय सावंत शिवसेनेची सत्ता आल्यापासून जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत. संजय सावंत यांनी खऱ्या अर्थाने जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे अच्छे दिन पाहिले आहेत. त्यावेळी त्यांनी केलेले काम हे देखील वाखाण्याजोग आहे. मात्र आता शिवसेनेचे दिवस पूर्वीसारखे राहिलेत असं म्हणता येणार नाही. पहिले कारण म्हणजे आता राज्यातील सत्ता जाईल असे म्हटले जात आहे. दुसरीकडे शिंदेंनी केलेल्या बंडामुळे जिल्ह्यातले पाचही आमदार गेले आहेत. आता हे आमदार गेले म्हणजे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, छोटे- मोठे नेते हे देखील ही जातील यात काहीच शंका नाही. यामुळे आता शिवसेना ज्याप्रकारे जिल्ह्यात बॅक फुटवर जाण्याची शक्यता आहे. त्यात आता सावंत यांना चांगले नेतृत्व करत शिवसेनेला पुन्हा पुढे आणायचे आहे.

तो काळ होता 1990 सालचा, जेव्हा सुभाष देसाई पहिल्यांदाच आमदार झाले होते. आणि त्यांच्यातल्या कुशल नेतृत्वामुळे बाळासाहेबांनी त्यांच्यावर जळगाव जिल्ह्याचा संपर्कप्रमुख ही जबाबदारी दिली. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आज शिवसेना दिसते. प्रत्येका गावाबाहेर शिवसेना आपल्या शाखेचा बोर्ड लावायचा हिंमत करते. कारण, त्याकाळी शिवसैनिकांमध्ये खऱ्या अर्थाने जोश सुभाष देसाई यांनी पेरला होता. त्याकाळी सुभाष देसाई आमदार असूनही जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना रुजावी शिवसेना वाढावी, यासाठी नेहमी दौरे करायचे. नेहमीच एसटीने यायचे आणि साध्या लॉजवर राहून शिवसेनेची वाढ करायचा प्रयत्न करायचे. सुभाष देसाई शिवसेना वाढविण्यासाठी मुंबईहून जळगावला एसटीने यायचे त्यावेळी कार्यकर्त्यांकडे इतके पैसेही नसायचे की त्यांचा तिकीट कार्यकर्ते भरून देऊ शकतील म्हणून ते तिकीटही स्वतःच्या खर्चाने काढायचे.

स्वतःचा पक्ष जळगाव जिल्ह्यात वाढावा यासाठी सुभाष देसाई हे नेहमीच कटिबद्ध असायचे. सध्याच्या काळात शिवसेना आता काही तितका लहान पक्ष राहिलेला नाही. मात्र स्वतःच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या बंडाळीमुळे जिल्ह्यात शिवसेनेला खंबीर असे एकही नेतृत्व उरलेले नाही. जिल्हाप्रमुख जरूर आहेत पण पाच आमदार ज्याप्रकारे नेतृत्व करायचे ते नेतृत्व सध्या शिवसेनेकडे जिल्ह्यात तरी उपलब्ध नाही. यामुळे आता संजय सावंत यांना जिल्ह्यात केवळ नेतृत्व करायचंच नाहीये, तर जिल्ह्यात नेतृत्व देखील घडवायचं आहे.

संजय सावंत जिल्ह्यात आठ दिवस राहणार इतकं ते म्हणाले आणि शिवसैनिकांमध्ये एकच उत्साह पाहिला मिळाला. त्यांनी केलेली भाषण देखील आता शिवसैनिकांची तोंडपाठ होत चालली आहेत. अशीच भाषण असेच उपदेश संजय सावंत यांना वेळोवेळी शिवसैनिकांना करावे लागतील. तरच शिवसैनिकांना पुन्हा एकदा उभारी मिळेल आणि शिवसेनेला पुन्हा एकदा चांगले दिवस पाहायला मिळतील.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख असलेले कन्हैया बंधू यांचा पोलिसांनी अत्याचार करून खून केला असा शिवसैनिकांचा नेहमीच आरोप असतो. याच कन्हैया बंधू मुळेच त्यांच्या बलिदानामुळे शिवसेनेला चांगले दिवस जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळतात असेही शिवसैनिक म्हणतात. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर जळगाव जिल्ह्यात निघालेला ‘तडीपार मोर्चा’ हा देखील सर्वांनाच ज्ञात आहे. शिवसैनिकांवर नेहमीच तडीपारीचे गुन्हे दाखल होतात. याच्याविरुद्ध जळगाव जिल्ह्यात हा मोर्चा सुभाष देसाई यांनी काढला होता. या मोर्चाची धग इतकी होती की, याची नोंद त्याकाळी खुद्द मुख्यमंत्र्यांना देखील घ्यावी लागली होती. असे अनेक किस्से सुभाष देसाई बद्दल शिवसैनिक नेहमीच सांगत असतात.

जळगाव जिल्ह्यात आज जी शिवसेना वाढत आहे. हि शिवसेना वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना बूस्टर डोस त्याकाळी सुभाष देसाई यांनी दिला. असं कित्येक शिवसैनिकांचा मत आहे.आता शिवसैनिकांना केवळ बुस्टर डोसचीच गरज नाहीये तर गरज आहे, ती खऱ्या अर्थाने असा नेता शोधण्याची जो नेता शिवसेनेला पुन्हा या धक्क्यातून बाहेर काढू शकेल. हाच नेता आता संजय सावंत यांना घडवायचा आहे. याच बरोबर त्यांना सवतःला देखील जिल्ह्याचे नेतृत्व करायचे आहे. जिल्ह्यात होणारा जन आक्रोश मोर्चा हा या नेतृत्वाची नांदी असेल असं म्हटलं जात आहे. मात्र त्यानंतर पुढे येणाऱ्या काळ हा शिवसेनेसाठी खऱ्या अर्थाने खडतर जरी असला तरी शिवसैनिकांकडून व्यवस्थित काम करून घेऊन. या खडतर काळाला अच्छेदिन बनवायचे आहेत.

सुभाष देसाई पुन्हा आमदार होतील की नाही माहीत नाही. पण यंदा ते आमदार झालेले नाहीत. यामुळे सर्वांचे लाडके सुभाष काका आता रिटायरमेंट घेतात की काय? असा प्रश्न पडला असतानाच मी तुम्हाला रिटायरमेंट घेऊ देणार नाही असं खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आणि पुन्हा एकदा सुभाष देसाई नावाचा चमत्कार संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना शिवसेना बघणार हे नक्की झालं. आजकालच्या राजकारणात जेव्हा एखादं पद किंवा एखादी आमदारकी खासदारकी मिळत नाही तेव्हा कित्येक लोक पक्ष सोडून जातात किंवा पक्षावर नाराज होतात मात्र सुभाष देसाईंनी असं काही केलं नाही यामुळे त्यांचा मान देखील शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.आणि त्यानंतर आपण बघितलं की हिंदुत्वासाठी किंबहुना इतर काही गोष्टींसाठी, शिंदे यांचा गट हा शिवसेनेतून बाहेर पडला आहे.

अशावेळी सुभाष देसाईंचा एकनिष्ठ ब्रँड हा संजय सावंत यांना वापरता येणार आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्याला कशाप्रकारे सुभाष देसाईंनी आपल पूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी झीजवलं मात्र शिवसेनेची गद्दारी केली नाही. हे उदाहरण देत जळगाव जिल्ह्यात पुन्हा सावंत यांना आता शिवसैनिक तयार करायचा आहे. मोठा करायचा आहे. शिवसेनेचे नेतृत्व घडवायचं आहे.