⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

शिवसेनेने बंडखोरांवर कितपत विश्वास ठेवावा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहर महानगरपालिका महापौर उपमहापौर निवडी निमित्त राजकारणाचे नवीनच गणित जळगावकरांसमोर आले आहे. संपूर्ण जळगावकरांना भाजपच्या फुटीर नगरसेवकांबाबत आकडेवारी आणि आर्थिक गणिते माहित झाली असून हीच गणिते भविष्यात घातक ठरणार आहेत. शिवसेनेने भाजपच्या ज्या नगरसेवकांवर विश्वास ठेवत आपलेसे केले त्या बंडखोरांवर कितपत विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्नच आहे. आज एक किलोची बॅग पाहून पक्षाशी गद्दारी करणाऱ्या करणारे उद्या दोन किलोची बॅग घेऊन पळ काढणार नाहीत यात कुठलीही शंका नाही.

शिवसेना, राष्ट्रवादी महाआघाडीने सांगली मनपाच्या धर्तीवर जळगाव मनपात देखील ‘करेक्ट कार्यक्रम’ करून भाजपचे २७ नगरसेवक फोडत मनपावर भगवा फडकवला. शहराच्या राजकारणात एकवेळ कायम दबदबा असलेले सुरेशदादा जैन यांच्या समर्थकांचीच पुन्हा मनपात चलती असणार हे यावरून दिसून आले. शिवसेनेने आज ज्या फुटीर नगरसेवकांच्या बळावर सत्ता स्थापन केली काही वर्षापूर्वी त्यातले बरेच शिवसेनेतच होते. मनपा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेला डच्चू देत भाजपच्या मंडपात आसरा घेतला होता. महापौर निवडीनिमित्त बंडखोरांना १ किलोची बॅग भेटल्याची चर्चा सर्वदूर आहे. चर्चेत तथ्य असले तर उद्या कुणी २-४ किलोची बॅग दिली तर हे बंडखोर पुन्हा शिवसेनेसोबत दगाफटका करणार नाही हे कशावरून? ‘प्यार और जंग मे सब जायज होता हैं।’ असे म्हटले जाते तसेच राजकारणात देखील आहे, जो आज आपला आहे तो उद्या आपला असेलच याची कुणीच ठोस शाश्वती देऊ शकत नाही. जे बंडखोर मनपा निवडणूकप्रसंगी खविआ, शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन, ना.गुलाबराव पाटील यांना झाले नाही, ज्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना भाजपात घेऊन आलेले आ.गिरीष महाजन यांनाही त्यांनी अंधारात ठेवले ते उद्या मनगटावर घड्याळ बांधतील किंवा पंजा दाखवत पुन्हा कमळाचा सुवास घेतील यात तिळमात्र शंका नाही.

जळगाव मनपावर आज पहिल्यांदाच शिवसेनेचा महापौर विराजमान झाला आहे. मनपाला शिवसेनेने जयश्री महाजनांच्या रूपाने उच्चशिक्षित महिला महापौर दिल्या आहेत. शिक्षण आले की विकास आपोआप होतो फक्त जोड हवी ती सहकाऱ्यांची. जयश्री महाजन यांच्यामागे आज पती विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह मोठे संख्याबळ आणि राज्याचे दिग्गज व सरकार पाठीशी आहे. भाजपातील बंडखोरांवर विश्वास न ठेवता त्यांनी वर्षभरातच विकासाची गंगा आणणे आवश्यक आहे. भाजपने ज्या चुका वारंवार केल्या त्यांचा अभ्यास करीत वर्षभरात महत्वपूर्ण विषय शिवसेनेने मार्गी लावल्यास उद्या बंडखोरांनी पुन्हा दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तरी पुढील पंचवार्षिक शिवसेनेच्या पाठीशी जळगावकर जनता असेल यात दुमत नाही.