जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । भुसावळ काळाचा महिमा किती अगाध असतो याची प्रचिती आज भुसावळात आली. कधी काळी शहरातील मुस्लीम बहुल असणार्या जाम मोहल्ला भागात शिवसेनेची शाखा तर दूरच पण कधी या पक्षाला पदाधिकारी वा कार्यकर्ते मिळणे दुरापास्त होते. त्याच शिवसेनेत अर्थात, आजच्या शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज जाम मोहल्ला भागात झोकात ‘एंट्री’ झाली.
सामाजिक कार्यकर्ते मकबूलभाई यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी पक्षात प्रवेश घेतला. यासोबत परिसरात तीन शाखांचे उदघाटन देखील करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, डॉ. मनोहर पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी संजय ब्राह्मणे, गजानन मालपुरे, नमा शर्मा, दीपक धांडे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याच प्रसंगी शिवसेनेच्या काही पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे देखील प्रदान करण्यात आली.