⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

….आणि गाव तिथे शिवसैनिक यावर भर द्या : ना. गुलाबराव पाटलांचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । शिवसैनिकांची नोंदणी हा पक्षाचा आत्मा असून शिवसंपर्क अभियानातून याला गती मिळाली आहे. आता यापुढे गाव तिथे शाखा, गाव तिथे शाखेचा बोर्ड आणि गाव तिथे शिवसैनिक यावर भर देण्याचे आवाहन शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगावात शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली. तर याच प्रसंगी शहरातील कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, आज सकाळी धरणगाव येथे शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महिला आघाडी जिल्हा संघटक महानंदा ताई पाटील तालुकाप्रमुख गजानन पाटील ,विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, नगराध्यक्ष निलेश चौधरी, यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते चोपडा रस्त्यापर्यंत दुभाजकांसह तीन प्रवेशद्वारांचे एकूण साडे 3  कोटी 50 लक्ष रूपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच शहरात अतिशय अद्ययावत असे ८० लाख रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या शौचालयाचेही लोकार्पण करण्यात आले. धरणगाव शहरात याच प्रकारातील सात शौचालये बांधण्यात येणार आहेत. या प्रकारचे उत्तर महाराष्ट्रातील हे पहिलेच शौचालय आहे हे विशेष. यासोबत व्हाईट हाऊस जवळच्या मंदिराजवळ सहा लाख रूपयांचे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून याचेही या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेच्या व्यापारी आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.व्पापारी सेना प्रमुख दिनेश येवले, उपप्रमुख प्रशांत वाणी, संचालक रुपेश अमृतकर यांची निवड करुन पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचा शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी धरणगांव राजपूत समाजाचे युवा नेते विनोद पुरभे, लोहार समाजाचे तरुण युवक संजय लोहार यांचा शिवसेनेत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिवसंपर्क अभियानासह अनेक विषयांना स्पर्श केला. ते म्हणाले की, पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी आपसातील मतभेद विसरून नव्यांना सन्मानाने संधी द्यावी. संघटना बळकटीकरणासाठी शिवसैनिकांनी सक्रीय राहण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसैनिकांची नोंदणी हा अतिशय महत्वाचा घटक असून यावर भर द्यावा. सर्वात महत्वाचे म्हणजे यापुढे गाव तिथे शाखा, गाव तिथे शाखेचा बोर्ड आणि गाव तिथे शिवसैनिक यावर भर देण्याचे निर्देश ना. पाटील यांनी दिले. मतदारसंघात जिथेही शिवसेनेचा सरपंच आहे.

त्या गावात सात दिवसांच्या आत फलक लावावेत. आपण या प्रकरणी स्वत: लक्ष घालणार असल्याची तंबी पालकमंत्र्यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वाधीक नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य व सभापती हे जळगाव ग्रामीण मधूनच झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केली.

ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा सबका साथ…सबका विकास असे नेहमी म्हणत असतो. प्रत्यक्षात सबका साथ…सबका विकास व सर्वांना त्रास अशी आजची स्थिती आहे. भाजप म्हणजे फसविणारी पार्टी आहे. त्यांचा जळगावातील खासदार हा शिवसेनेच्या मदतीने निवडून आला असला तरी आता ते मान्य करत नाहीत. मात्र शिवसेना आगामी काळात हा हिशोब पूर्ण करणार असल्याचा इशारा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला.

यावेळी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आक्रमकतेने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाला न्याय देऊन जबाबदारीने जनतेची काम करण्याचे निर्देश दिले. विरोधकांवर टीका करताना म्हटले की अंगावर आल्यास शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडला. मेळाव्याचे नियोजन अत्यंत विशिष्ट पद्धतीने सुष्म नियोजन करून भव्य स्वरूपाचे केल्याबद्दल पदाधिकारी व नपाचे कौतुक केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, आघाडीच्या जिल्हा संघटक महानंदाताई पाटील , उप जिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर तालुका प्रमुख गजानन नाना पाटील ,यांनीही मनोगतात  शिव संपर्क अभियान यशस्वी करून पक्ष बळकटी करणासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

देशातील एक नंबर चे लोकप्रिय मुख्यमंत्री मा उध्दवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ पालकमंत्री गुलाबरावजी याच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस महाराष्ट्र सचिव डी जी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, शहर अध्यक्ष निलेश भागवत चौधरी, काँग्रेस कार्यकर्ते अरुणा कंखरे, रतिलाल चौधरी, विकास लांबोळे, सम्राट परीहार, रामचंद्र महाजन हे महाविकास आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील  यांनी केले . सूत्रसंचालन उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी केले तर नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी मानले.